नागपूर - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पुरुषाच्या मृतदेहाऐवजी महिलेचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लता मंगेशकर रुग्णालयातील हा प्रकार असल्याचे समोर आले आहे. अंत्यसंस्कार करताना हा प्रकार समोर आला. यावरून प्रशासन व रुग्णालय प्रशासनावर नातेवाईकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाच्या मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या सोबत मोजक्या नातेवाइकांना स्मशानभूमीत नेण्यात येते. परंतु, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका पुरुषाच्या मृतदेहाजागी नातेवाईकांना चक्क महिलेचा मृतदेह सोपवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील लता मंगेशकर रुग्णालयातील हा संपूर्ण प्रकार स्मशानभूतीत अत्यंसंस्कार करताना उघडकीस आला आहे.
रुग्णालयाकडून मृत्यू झालेल्या पुरुषाऐवजी महिलेचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्याात आला होता. दरम्यान, स्मशान भूमीवर नातेवाईकांकडून मृत व्यक्तीचा चेहरा पाहण्यासाठी संबंधित (मृतदेह आणणारे) कर्मचाऱ्यांना विनंती करण्यात आली. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. यावरून महानगरपालिका व रुग्णालय प्रशासनाच्या गलथन कारभाराविरोधात नातेवाईकांकडून रोष व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर याबाबत महानगरपालिका व रुग्णालय प्रशासन कोणीही चूक झाल्याचे कबूल करत नसल्याचा आरोपही मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.
कोरोनामुळे नागपुरातील मृतांचा आकडा वाढत आहे. आधिच रुग्णालयात खाटांची कमतरता आहे. शिवाय उपचारांचा अभावही दिसून येत आहे. अशात मृतदेहातच बदल होत असल्याने महानगरपालिका व रुग्णालय यांचा बेजबाबदारपणा पुन्हा समोर आला आहे.
हेही वाचा - नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे कोरोनामुक्त