नागपूर Woman Molested In Plane : पुण्यावरुन नागपूरला येत असलेल्या विमानात एका प्रवासी महिला प्रवाश्याची छेड काढत असभ्य वर्तन केल्यानं खळबळ उडाली. फिरोज शेख नूर मोहम्मद शेख (32) असं विमानात महिलेची छेड काढणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं विनयभंग करणाऱ्या फिरोज शेख नूर मोहम्मद शेखची तक्रार सोनेगाव पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली आहे. पोलिसांनी फिरोज शेखला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं विनयभंग प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.
विमान लँड होताना केला अश्लील ईशारा : मंगळवारी पुणे नागपूर विमान नागपूर विमानतळावर लँड होत होतं. यावेळी विमानातील बाजुच्या सीटवर बसलेल्या फिरोज शेख नूर मोहम्मद शेख या नराधमानं महिलेकडं पाहून अश्लील इशारा केला. त्यामुळे तक्रारदार महिलेच्या मनास लज्जा वाटून विनयभंग झाल्याचं पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. त्यामुळे या पीडित महिलेनं सोनेगाव पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीनं विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली.
महिलेनं आरोपीला दिला चोप : पीडित महिला ही डॉक्टर असून ती वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पुण्याहून नागपूरला प्रवास करत होती. महिलेच्या बाजुला बसलेल्या फिरोज शेख नूर मोहम्मद शेख यानं विमानानं उड्डाण भरल्यापासूनचं महिलेकडं पाहून अश्लील इशारा आणि हावभाव केल्याचा आरोप केला आहे. विमानातून बाहेर येताना त्यानं कळस गाठल्यानं पीडित महिलेनं आरोपीला चोप दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी तक्रारदार डॉक्टर महिलेनं दिलेल्या तक्रारीवरुन सोनेगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम 354, 354 (अ), 509 भादंवि अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा :