नागपूर - जिल्हा परिषदेच्या ५८ आणि पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी आज (७ जानेवारी)ला मतदान होत आहे. आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यासाठीच प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. मात्र, मंत्रीमंडळाच्या बैठकीमुळे त्यांना स्वतःच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उपस्थित राहता येणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आज मुंबई येथे मंत्रीमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री असल्याने त्यांना बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यातच अनिल देशमुख यांच्या गृह जिल्ह्यात आणि मतदारसंघात आज जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान सुरू आहेत. मात्र, मंत्रीमंडळाच्या बैठकीमुळे अनिल देशमुख हे मतदानाला मुकण्याची शक्यता आहे. बैठक आटोपून ते मतदानाच्या वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न नक्की करतील. पण त्यांची ही तारेवरची कसरत यशस्वी होईल का? हे सायंकाळीच स्पष्ट होईल.
दरम्यान, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने चांगलीच मोर्चेबांधणी केली, तर महाविकास आघाडीतील शिवसेना वेगळी लढत आहे. भाजप देखील 'एकला चलो'च्या भूमिकेत स्वतंत्र लढत आहे.