नागपूर - हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्र्यांचा रामगिरी हा शासकीय बंगला सज्ज झाला आहे. रामगिरीनंतर सर्वात महत्त्वाचा मानला जाणार देवगिरी बंगला देखील सज्ज होत आहे. मात्र, अद्याप उपमुख्यमंत्री कोण असेल? हे अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे आता हा बंगला कोणाला मिळणार? याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
देवगिरी बंगला उपमुख्यमंत्री किंवा दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वाच्या नेत्याला दिला जातो. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आणि जयंत पाटील या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री पद मिळणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र, उपमुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नावाची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री कोण होणार? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे वाचलं का? - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी नागपुरातील रामगिरी बंगला सज्ज
राज्याला उपमुख्यमंत्री मिळाले नसले, तरी देवगिरी बंगल्याला सजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रंगरंगोटी व इतर महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. एकूणच हा बंगला नव्या उपमुख्यमंत्र्यांसाठी सज्ज झाला आहे. आता हा बंगला अजित पवारांना, की जयंत पाटलांना मिळणार? की तिसऱ्याच नेत्याची वर्णी लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.