नागपूर - येणाऱ्या काळात पाणी टंचाईचे संकट नागपूर विभागात उद्भवणार असल्याचे चित्र दिसत आहे. नागपूर शहराला १० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक राहिला आहे. पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यातील परिस्थितीही दुष्काळाची आहे. पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यातील मोठ्या धरणात फक्त १० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने संकट वाढण्याची शक्यता आहे.
या पूर्वी नागपूरच्या इतिहासात कधीही न निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईला नागपूरकरांना तोंड द्यावे लागणार आहे. नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्पात केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. मध्यप्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्यामुळे नागपूरकरांवर ही परिस्थिती ओढवणार आहे. ही परिस्थिती केवल नागपूरपूरती मर्यादित नसून पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे.
जून महिन्यात पाऊस आला नाही तर पाण्यासाठी होणार 'वन वन'
मोठ्या धरणात फक्त १० टक्के, मध्यम धरणात १७ टक्के तर लहान धरणात १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्यात पाऊस पडला नाही तर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. नागपूर विभागात ६ जिल्ह्यांचा समावेश आहे. यात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मोठे १८ प्रकल्प, मध्यम ४० तर लघु ३१४ प्रकल्प आहे. या प्रकल्पात साधारण १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे आणि हा सगळा साठा १० जूनपर्यंत पुरेल एवढाच आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन सिंचन विभाग करत आहे.
नागपूर विभागातील प्रकल्पांची पाण्याची पातळी-
- धरणांची संख्या यावर्षीचा साठा मागच्या वर्षीचा साठा
- मोठी - १८ १० टक्के ३० टक्के
- मध्यम - ४० २७ टक्के २७ टक्के
- लघु - ३१४ १० टक्के २० टक्के
मागच्या वर्षीच्या तुलनेत हा साठा अर्ध्यावर आहे. त्यामुळे जर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आला नाही तर पूर्व विदर्भात पाणी टंचाईचे संकट भीषण होणार आहे. त्यामुळे जनतेनेसुद्धा पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.