नागपूर- गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह लगतच्या मध्यप्रदेश येथे दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील चौराई धरण पूर्ण भरले आहे. चौराई धरणाचे ९ दरवाजे उघडण्यात आल्याने तेथून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे तोतलाडोह धरण सुद्धा पूर्ण भरले असल्याने धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. याच सोबत जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या पेंच धरणाचे १६ दरवाजे उघड्यात आले आहेत. परिणामी कन्हान, सांड व सूर नदीला पूर आला आहे.
गुरुवारी रात्री पासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. नागपूर शहरात सुद्धा कमी जास्त प्रमाणात पावसाची रिप-रिप सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. पेंच, तोतलाडोह धरणातून पाणी सोडण्यात आल्याने अनेक ठिकाणच्या नदी काठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.