नागपूर Vijay Wadettiwar On Sujay Vikhe Patil : राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. पुढील काळात इंजिनेचे डबे सुद्धा घसरले दिसतील, सत्तेसाठी काहीही करण्याची यांची वृत्ती आहे. हे केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत अशी टीका, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलीय. महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यातील विदूषक म्हणून हे ठरतील अशी परिस्थिती आहे. तसेच बारामतीची जागा महायुतीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) लढवतील अशी चर्चा आहे. हा त्यांचा प्रश्न आहे कोणी दावा काय करायचा तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांच्या अंतर्गत लाथाळ्यांमध्ये आम्हाला पडायचं नाही.
जातीनिहाय जनगणना हा एकचं पर्याय : मागासवर्गीय आयोग केवळ मराठ्यांचं सर्वेक्षण करणार असं म्हणत आहे. मी सुद्धा भूमिका मांडलेली आहे. जर सर्वेक्षण करायचं आहे तर सर्व समाजाचं करा, ओबीसीच्या लोकांना कास्ट सर्टिफिकेट मिळवत असताना वर्ष-वर्ष थांबून राहावं लागतं आणि अनेकांना नोकरी पासून मुकावं लागत. खूप मोठं नुकसान ओबीसी समाजाचं होत आहे. सर्वेक्षण करायचं आहे तर जातनिहाय जनगणना सर्वांची करा. राहुल गांधी म्हणतात त्या पद्धतीने झालं तरच यावरचा फायनल तोडगा निघू शकेल, नाही तर पुन्हा राज्यांमध्ये समाजात आपसात भांडणं होत राहतील.
हिवाळी अधिवेशनची रणनीती ठरवणार : हिवाळी अधिवेशनच्य पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक होत आहे. अधिवेशनाचा कालावधी दहा दिवसाचा आहे, तर आता या दहा दिवसांच्या अपुऱ्या कालावधीमध्ये कुठल्या प्रश्नाला आपण घेतलं पाहिजेत, कुठले मुद्दे मांडले पाहिजेत यावर चर्चा केली पाहिजे. त्याबरोबरच सरकारला घेरण्यासाठी काय केलं पाहिजे यावर चर्चा होईल. एकंदरीत रणनीती ठरवली जाणार असल्याचं ते म्हणाले.
२०२४ मध्ये परिवर्तन होईल : राजस्थानमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. मध्यप्रदेशमध्ये आम्ही शंभर टक्के जिंकत आहोत, छत्तीसगड तर आम्ही जिंकलेलंच आहे आणि विशेष रूपाने स्पष्ट बहुमत तेलंगणामध्ये मिळतंय ते आता स्पष्टपणे दिसत आहे. देशात २०२४ मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात आता होईल.
किमान २०० जागा महाविकास आघाडी जिंकेल : लोक आता वाट बघत आहेत. मत मागायला तर या तुम्हाला दाखवतो, असं मतदार बोलून दाखवत आहेत. फक्त एवढंच की, नशिबाने त्यांनी हातात काही घेऊ नये. म्हणजे इथपर्यंत लोकांच्या मनामध्ये चीड आहे. इथपर्यंत लोकांच्या मनामध्ये उद्रेक आहे. महाराष्ट्राच्या हिताचा कुठलाही निर्णय घेत नाहीत. स्वस्वार्थासाठी हे सरकार आहे हे जनतेला कळून चुकलं आहे. त्यामुळं पाच राज्याच्या निवडणुकानंतर महाराष्ट्रामध्ये किमान २०० जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा त्यांनी केलाय.
सडेतोड उत्तर देण्याची आमच्यामध्ये कुवत : तुम्ही सगळ्यांना धमकवता, विरोधकांना संपवा ही जी आता यांची मस्ती आहे, म्हणजे तुम्ही काहीही कराल तरी उघड्या डोळ्यांनी आम्ही बघायचं पण काहीही बोलायचं नाही आणि यांनी केलेल्या पापावर पांघरून घालत गुपचूप राहायचं. अशी जरी या लोकांची भूमिका असेल तर मला वाटते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. विरोधकांना जेवढं दाबण्याचा प्रयत्न करा तेवढी जनता तुम्हाला दाबल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे वक्तव्य करणं टाळा तर तुम्हाला किमान जनता थोडी उभी तरी करेल, नाहीतर जनता तुम्हाला साफ आडवं केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही धमकी देऊन महाराष्ट्राला चालवू शकत नाही. विरोधकांना घाबरवून महाराष्ट्राला विकासाच्या दिशेला नेऊ शकत नाही. राज्याचा मागचा इतिहास, वारसा सगळं बघून पुढं नीट बोलण्याची भूमिका घ्या. सरकार म्हणून तुमचं चुकत असेल त्यावर प्रहार करणं हे आमचं काम आहे, ते उद्धव ठाकरे करत आहेत. कोणी धमकावून राजकारण करत असेल तर त्याला सुद्धा सडेतोड उत्तर देण्याची आमच्यामध्ये कुवत आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा -