नागपूर - महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प जाहीर झाला. यामध्ये विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली आहे, अशी टीका शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या पावलावर पाऊल टाकणारा अर्थसंकल्प आहे. श्रीमंतांना आणखी श्रीमंत केले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांना काहीही मिळणार नसल्याचे जावंदिया म्हणाले. तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये विदर्भाच्या दृष्टीने काहीही वेगळे नाही. सर्व लक्ष ओलीत शेती असणाऱ्यांकडे देण्यात आले असून कोरडवाहू शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. असमानी आणि सुलतानी संकटाशी लढण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना बळ देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या सरकारने सर्व अपेक्षा फोल ठरवल्याचे जावंदिया म्हणाले.
कोरडवाहू शेतकरी निसर्गाच्या अनिश्चिततेवर जगतो. त्यासाठी सरकारने काहीच दिलेले नाही. बच्चू कडू आता मंत्रिमंडळात आहेत. ते आधी बोलायचे. मात्र, आता काहीच बोलत नाही. उद्धव ठाकरेंच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, असे ते म्हणाले. तसेच विम्याबद्दल आणीबाणीची बैठक बोलवावी आणि पीकविम्यावर तोडगा काढावा, असेही ते म्हणाले.