नागपूर : येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आज (रविवार) शहरातील कार्यालय परिसरात ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतळे जाळले. गेल्या अनेक दिवसांपासून अवाजवी वीजबिल वाढ प्रकरणी महावितरण विरोधात आंदोलन सुरू आहे. यावरुन चार दिवसांपूर्वी देखील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या घरासमोर विदर्भवाद्यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला होता. मात्र, ते आंदोलन पोलिसांनी होऊ दिले नाही म्हणून आज विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मुख्यमंत्री आणि उर्जामंत्र्यांचे पुतळे जाळले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान, या काळात सर्व जनता घरी थांबली असताना विजेचा उपयोग साहजिकच वाढला आहे. मात्र, महावितरणद्वारे यादरम्यान अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवण्यात आले. एकीकडे कोरोनामुळे हातचे काम निघून गेले, तर दुसरीकडे कोरोनाच्या चार महिन्यांच्या काळात जवळ शिल्लक असलेल्या पैशातून कुटुंबाचा गाडा हाकणे सुरू आहे. त्यात महावितरणकडून वीजबिलाचा बॉम्ब फोडण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांची भंबेरी उडाली आहे. त्यात आता पुढे पोट कस भरायचे ही परिस्थीती जनतेसमोर असताना आता विजेचे बिल कसे भरणार हादेखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे शुक्रवारी संपूर्ण विदर्भात वीजबिल वापसी आंदोलन करण्यात आले होते. कोरोना काळातील सर्व विदर्भातील जनतेचे वीजबिल माफ करणे, वेगळा विदर्भ यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. वीजबिल संदर्भांत ऊर्जामंत्री केंद्र शासनाकडे बोट दाखवून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून संपूर्ण विदर्भभर ऊर्जामंत्री व महाराष्ट्र सरकारचे पुतळे जाळायला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार आज शहरातील कार्यालय परिसरात ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतळे जाळण्यात आले.