नागपूर : नागपूरच्या सभेत महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची वज्रमूठ कायम राहणार का? यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते सातत्याने दोन भूमिका घेताना दिसत आहेत. मी नागपूरच्या वज्रमूठ सभेत उपस्थित असेल मात्र, ऐनवेळी मला दिल्लीला काम असल्यास मी दिल्ली दौऱ्याला आधी प्राधान्य देईल, अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वज्रमूठ कायम राहील का असा प्रश्न विचारला जात आहे.
१६ एप्रिलला नागपुरात वज्रमूठ सभा : महाविकास आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा ही १६ एप्रिलला नागपुरात होणार आहे. सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. वज्रमूठ सभेसाठी पूर्व नागपूर येथील दर्शन कॉलनीतील खेळाच्या मैदानाची निवड करण्यात आली आहे. नागपूर सुधार प्रन्यासने मैदानाची परवानगी देखील दिली आहे. आता नागपूर सुधार प्रन्यासने दिलेल्या परवानगीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. ही परवानगी रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे.
भाजप राष्ट्रवादीची जवळीक : अदानी यांच्या व्यवहाराची चौकशी करण्याच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, इतर काँग्रेस नेत्यांमध्ये मतमतांतरे आहेत. राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका भारतीय जनता पक्षासाठी सोयीची असल्याने भाजप, राष्ट्रवादीमध्ये जवळीक निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम राहील का असा प्रश्न विचारला जातो आहे.
वज्रमूठ सभेनंतर राहुल गांधींची सभा घेणार : १६ एप्रिलला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नागपुरात झाल्याच्या अवघ्या काही दिवसात म्हणजे २० ते २५ एप्रिल दरम्यान राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरर्गे यांची एक मोठी सभा नागपुरात घेण्याचा नियोजन असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणीची बैठक ठाण्यात बोलावण्यात होती. त्यात नागपूर येथे राहुल गांधीची जाहीर सभा आयोजित करून २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात येईल यावर शिक्कामोर्तब झाला आल्याची माहिती आहे.
वज्रमूठ सभेत काँग्रेसला किती महत्व : महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे झालेली वज्रमूठ सभा, नाना पटोले यांच्या गैरहजरीमुळे चर्चेत आली होती. नागपूरच्या सभेसंदर्भात देखील नाना पटोले सकारात्मक दिसत आहेत. मात्र, दिल्लीचे बोलावणे आल्यास दिल्लीला प्राधान्य दिले जाईल, अशी गुगली टाकून नानांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे वज्रमूठ सभेत काँग्रेसला किती महत्त्व मिळेल हे बघण्यासारखे असेल.
वज्रमूठ सभा वादाच्या भोवऱ्यात : १६ एप्रिल रोजी नागपुरात आयोजित होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेसाठी पूर्व नागपूर भागातील दर्शन कॉलनीतील मैदान देण्यास भाजपने विरोध केला आहे. हे मैदान खेळासाठी आरक्षित असल्याने राजकीय सभांसाठी हे मैदान देण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी पूर्व नागपुरातील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. या मैदानासाठी ज्या अटींवर परवानगी देण्यात आली आहे, त्या अटींची पूर्तता केल्यानंतरच या मैदानावर महाविकास आघाडीची सभा होणार असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे.
हेही वाचा - Chandrakant Patil On Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरेंबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर - चंद्रकांत पाटील