नागपूर - केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात आजपासून (दि. 1 मे) राज्यात 18 वर्षे वयोगटावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या अभियानाला सुरुवात झाली आहे. राज्याची उपराजधानी नागपूर शहरात देखील तीन ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत या महाअभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आज केवळ प्रातिनिधिक स्वरूपात हे अभियान सुरू झाले असून प्रत्येक केंद्रावर केवळ 300 जणांना लस दिली जाणार आहे. तरी येत्या काळात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार आहेत. त्यावेळी लसीकरण केंद्र वाढवून तरुण वर्गाचे लसीकरण करणार असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.
नागपूर शहारतील तीन ठिकाणी 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार असल्याने या लसीकरण केंद्रांवर सकाळपासून तरुणाईने प्रचंड गर्दी केली होती. मात्र, प्रत्येक केंद्रांवर केवळ तीनशे नागरिकांना लस दिली जाणार असल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडली. लस दुपारी उपलब्ध झाल्याने दोन वाजल्यापासून लसीकरण सुरू करण्यात आले. पुढील काही दिवस सर्वच टप्यातील नागरिक लसीकरणासाठी गर्दी करणार असल्याने लसीकरण केंद्रांवर गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
18 वर्षे वयोगटात 19 लाख लाभार्थी
नागपूर शहर आणि जिल्ह्यात 18 वर्षे वयोगटात 19 लाख नागरिक आहेत. या सर्वांचे लसीकरण टप्या-टप्यात करावे लागणार आहे. त्यासाठी लाखो डोस लागणार आहेत. मात्र, सध्या निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेता राज्य सरकारला त्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यातील नागरिकांचा दुसरा डोस देखील सुरू झाल्याने लसीकरण मोहिमेची गती मंदावण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - उपराजधानीला 200 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज, गडकरींनी घेतला आढावा