नागपूर - केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोविड लसीकरणाचा प्रारंभ नागपुरात झाला. मनपाच्या पाचपावली स्त्री रुग्णालय केंद्रावरील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री नितीन राऊत आणि महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा रुग्णालय, एम्स या ठिकाणीही एकाचवेळी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.
हेही वाचा - ५० हजारांची लाच घेताना समाज कल्याण अधिकाऱ्याला अटक
नागपुरात यापूर्वी दोन वेळा कोविड लसीचे ‘ड्राय रन’ झाले. त्याच धर्तीवर केंद्र शासनाच्या दिशानिर्देशानुसार पाचपावली केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. मनपाच्या पाचपावली स्त्री रुग्णालयातील केंद्रावर तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे यांनी पहिली लस घेतली. यानंतर प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता बाळकोटे-खंडाईत, नेताजी सुभाषचंद्र बोस नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा विवेकानंद मठपती, मातृत्व व बालकल्याण वैद्यकीय अधिकारी वैशाली मोहकर यांनी लस घेतली.
परिचारिका राजश्री फुले आणि रजनी मेश्राम यांनी आरोग्य सेवकांना लस दिली. लस घेतल्यानंतर सर्वांना अर्धा तास निगराणी कक्षात ठेवण्यात आले. अर्धा तासापर्यंत त्यांना कुठलाही त्रास जाणवला नाही. त्यामुळे, त्यांना घरी पाठविण्यात आले.
आठवड्यातून चार दिवस लसीकरण
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, संपूर्ण राज्यात आज लसीकरणाचा शुभारंभ झाला. नागपूर शहरात पाच केंद्रावर लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर आठवड्यातून चार दिवस लसीकरण होणार असून, प्रत्येक दिवशी प्रति केंद्र १०० व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. संपूर्ण यंत्रणा सज्ज असून लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आरोग्य यंत्रणा राहणार आहे. २८ दिवसानंतर दुसरा डोज देण्यात येणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
आजचा दिवस आनंदाचा - महापौर दयाशंकर तिवारी
वर्षभरापासून कोविडच्या संक्रमणाने शहर त्रस्त झाले होते. या काळात आरोग्य सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी प्रयत्न केले. वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर भारतात लस उपलब्ध झाली असून, आज लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला, याचा आम्हाला अभिमान आहे. आजचा दिवस आनंदाचा असून या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी म्हटले.
पहिल्या टप्प्यात ‘हेल्थ वर्कर’ला लस - आयुक्त राधाकृष्णन बी.
कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोविड काळात सातत्याने समोर राहून वैद्यकीय सेवा देणाऱ्या ‘हेल्थ वर्कर’ला लस देण्यात येणार आहे. त्यानुसार नागपूर शहरात साडे बावीस हजार आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या या सर्व हेल्थ कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात काँग्रेसच बाजी मारणार- सुनील केदार