नागपूर - आजचं युग हे विज्ञानाचे असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल विज्ञानाकडे असल्याचं चित्र आपल्याला देशात बघायला मिळते. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी अनेक उपाय आणि प्रयत्न केले जातात. मोठ-मोठ्या प्रयोग शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या कल्पनांना मूर्त स्वरूप देतात. मात्र, सरकारी किंवा महानगर पालिकेच्या शाळांमध्ये ( Nagpur Municipal Corporation Schools ) शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी विज्ञान हा विषय केवळ पुस्तकांपुरताच मर्यादित राहिला आहे.
विज्ञानातील प्रयोग कसे करायचे याबद्दल फारसी माहितीच उपलब्ध होत नसल्याने हे विद्यार्थी मागे राहतात. ही समस्या लक्षात घेत नागपूर महानगर पालिकेकडून मनपाच्या शाळांमध्ये 'अद्ययावत स्टेम लॅब'ची ( Stem Lab in Nagpur ) निर्मिती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विज्ञानातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणितातील घटक विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने प्रयोगाच्या माध्यमातून शिकता यावे यासाठी नागपूर मनपातर्फे साकारण्यात आलेल्या तीन शाळेत 'अद्ययावत स्टेम लॅब' तयार केली आहे. मनपाच्या शाळेतील शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नागपूर महानगरपालिका सतत प्रयत्नशील आहे. यासाठी मनपाच्या शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात प्रयोगातून विज्ञान शिकता यावे, यासाठी मनपाच्या ७ शाळांमध्ये 'अद्ययावत स्टेम लॅब'ची निर्मिती करण्यात आली आहे.
आमदार निधीतून अद्ययावत लॅब -
आमदार प्रवीण दटके यांच्या आमदार निधीतून मनपाच्या ७ शाळांमध्ये अद्ययावत लॅब तयार करण्यात येत आहेत. यापैकी 3 शाळेत हे स्टेम लॅबचे सुरू करण्यात आलेल्या आहेत. लवकरच संपूर्ण नागपूर शहरातील मनपाच्या शाळांमध्ये स्टेम लॅबची निमिती केली जाणार आहे.
अपूर्व विज्ञान मेळावा -
मनपाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची माहिती सहज, सोप्या पद्धतीने, खेळाच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी यासाठी मनपाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातीलच एक उपक्रम म्हणजे अपूर्व विज्ञान मेळावा आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून मनपाचे विद्यार्थी शहरातील अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांना प्रयोगाच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणाऱ्या संसाधनाद्वारे विज्ञानाचे धडे देतात. आता मनपाचे विद्यार्थी प्रत्येक विषय प्रयोगाच्या माध्यमातून शिकू शकणार आहेत. 'स्टेम लॅब'च्या माध्यमातून विद्यार्थी नैसर्गिक पद्धतीने आपल्या बुद्धीला विकसित करून खेळातून विज्ञानाला आत्मसात करू शकणार आहेत, असे मत नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केले.