नागपूर - महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात महापौर, सत्ताधारी आणि विरोधक, असा सामना रंगला असताना या वादात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उडी घेतली आहे. गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्य मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे आयुक्त मुंढे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मुंढे यांनी बेकायदेशीरपणे आणि असंवैधानिकपणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्याचे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सरकारच्या आदेशानुसार, स्मार्ट सिटी कंपनीची स्थापना करण्यात आली. महापालिका आयुक्त मुंढे हे या कंपनीत बोर्ड ऑफ डायरेक्टर व सीईओ म्हणून स्वतःहून नियुक्त झाले आहेत. वास्तविक पाहता बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मान्यतेनंतरच नव्या सदस्याचा संचालक मंडळात समावेश केला जातो. परंतु, ३१ डिसेंबरनंतर संचालक मंडळाची एकही बैठक न होता आयुक्त तुकाराम मुंढे हे बेकायदेशीररीत्या संचालक मंडळ सदस्य व सीईओ झाले, असे या तक्रारीत म्हटले आहे.
शिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पाची बँकेत असलेली 18 कोटींची ठेवीची रक्कम 2 खासगी कंत्राटदारांना वळवण्यात आल्याचा आरोप देखील महापौर संदीप जोशी यांनी केला होता. शासनाच्या बँकेतील ठेवी आयुक्त मुंढे यांनी नियम धाब्यावर बसवून तोडण्यात आल्याचा आरोप महापौरांनी केला होता. महापौर संदीप जोशी यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांची तक्रार पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली. तसेच योग्य कारवाई करण्याची मागणी गडकरी यांनी केली आहे. या वादात आता गडकरी यांनी थेट उडी घेतल्याने मुंढे यांच्यावर काय कारवाई होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.