नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली. गडकरींना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सक्रिय राहून त्यांनी ऑक्सिजन सह वैद्यकीय सोयी सुविधा पुरवत कोरोना उपाययोजनांच्या कामातही आपला वेगळा ठसा उमटवला होता.
रेमडेसिवीरचा तुटवडा झाला तेव्हा त्यांनी वर्धेतल्या एका कंपनीला प्रोत्साहन देउन हे औषध तयार करायला लावले होते. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा ही त्यांनी पुढाकार घेत अनेक उद्योगांना ऑक्सिजन निर्मीतीसाठी प्रयत्न केले होते. या धावपळीत त्यांना 16 सप्टेंबर 2020 रोजी पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणे दिसून आली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्लानुसार ते सध्या होम क्वॉरंटाईन आहेत.