नागपूर : शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा १४ वर्ष कारावास भोगल्यानंतर आता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गुलाब गवळी यांनी उर्वरित शिक्षा माफ करावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अरुण गवळी यांनी वयाची ७० वर्षे पूर्ण केल्याच्या कारणावरून मुदतपूर्व सुटकेसाठी न्यायालयात अर्ज सादर केला असून यावर १५ मार्च रोजी सूनवाई होणार आहे.
२००६च्या शासन अधिसूचनेनुसार १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर बंदिवान मुक्त होण्यास पात्र असल्याचा दाखल दिला आहे. बंदिवानाने वयाची ६५ वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण केली आहे. बंदिवान वृद्धापकाळाने आजारी आहे. अरुण गवळी यांनी महाराष्ट्र कारागृह (शिक्षेचे पुनरावलोकन) नियम, 1972 च्या नियम-6 मधील उप-नियम (4) च्या नुसार आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी मिनेझिस यांच्या खंडपीठाने अरुण गवळी यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर नोटीस बजावली सरकारला 15 मार्च पर्यत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
अरुण गवळीवर हत्येचा आरोप : शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या २ मार्च २००७ राजी घडली होती. रात्री कमलाकर जामसांडेकर घरी असताना त्यांच्यावर गोळीबार झाला ,त्यात त्यांचा मृत्यू झाला. कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी पोलिसांनी अरुण गवळीला अटक केली होती, तेव्हापासून ते कारागृहात बंद आहेत.
नागपूर कारागृहात घेतले शिक्षण : मारामारी, अपहरण, खून या सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यावर्षी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून पदवीधर झाले आहे. आपली सत्ता आणि वर्चस्व कायम ठेवण्यासाठी गुंडगिरीमध्ये पदव्युत्तर राहिलेल्या अरुण गवळीला नागपूरच्या कारागृहात शिक्षणाचे महत्त्व उमगले होते. त्यामुळे अरुण गवळी यांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहात राहून पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.