नागपूर- अखिल भारतीय सेनेचे संस्थापक आणि अंडरवर्ल्ड डॉन म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या अरुण गवळीला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संचित रजा मंजूर केली आहे. न्यायालयानं गवळीला २८ दिवसांची रजा मंजूर केली आहे. उपमहानिरीक्षक कारागृह अधीक्षक यांनी अरुण गवळीचा अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे अरुण गवळीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्ये प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. संचित रजा (फरलो) मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यानं अर्ज केला होता. यासंदर्भात उच्च न्यायालयानं कारागृह उपमहानिरीक्षकांना नोटीस बजावून यावर १४ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता न्यायालयानं अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे.
मुदतपूर्व सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव- शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा १४ वर्ष कारावास भोगल्यानंतर अरुण गवळी याने उर्वरित शिक्षा माफ करावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अरुण गवळी यानं वयाची ७० वर्षे पूर्ण केल्याच्या कारणावरून मुदतपूर्व सुटकेसाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. २००६च्या शासन अधिसूचनेनुसार १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर बंदिवान मुक्त होण्यास पात्र असल्याचा दाखल दिला होता.
म्हणून फेटाळला होता अर्ज- अरुण गवळीनं कारागृह उपमहानिरीक्षकांकडे संचित रजा अर्ज सादर केला होता. परंतु अरुण गवळी मुंबईत गुन्हेगारांच्या टोळीशी संबंधित असल्याने संचित रजेवर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यामुळे अरुण गवळीकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला होता.
अरुण गवळीवर काय आहे आरोप: शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या २ मार्च २००७ राजी घडली होती. रात्री कमलाकर जामसांडेकर घरी असताना त्यांच्यावर गोळीबार झाल्यानं मृत्यू झाला. कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी पोलिसांनी अरुण गवळीला अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहात असून यावर्षी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून पदवीधर झाला आहे.
हेही वाचा-