नागपूर - मी पवारसाहेबांचे का ऐकले?, असा प्रश्न सर्वांना पडला असेल, मी त्यांचे ऐकले कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पवारसाहेबांचे २ वेळेस ऐकले होते. म्हणून मी पवारसाहेबांचे ऐकल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. पवारसाहेब आणि बाळासाहेब यांच्यात मतभेद होते, मात्र त्यांची मैत्री कधीच तुटली नाही, ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की, मुख्यमंत्री होईन. पण मी झालो, हे माझे भाग्य असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. प्रतिभाताई पाटील आणि आमच्या कुटुंबाचे पूर्वीपासून संबंध आहेत. राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी आमच्यावर अनेकांनी दडपण आणले. मात्र, बाळासाहेब ठाकरेंनी ठामपणे प्रतिभाताईंना पाठिंबा दिल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
तेव्हा अनेकांना धरणीकंप झाल्यासारखे वाटले
बाळासाहेबांनी जेव्हा प्रतिभाताईंना राष्ट्रपती होण्यासाठी पाठिंबा दिला, तेव्हा अनेकांना धरणीकंप झाल्यासारखे वाटले. महाराष्ट्राची एखादी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर जात असेल तर, त्याला जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका बाळासाहेबांनी घेतल्याचे ठाकरे म्हणाले. त्यावेळी अनेकांनी दडपण आणले होते, या तारखेपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर... असे काहीजण म्हणायचे. मात्र, बाळासाहेबांनी प्रतिभाताईंना पाठिंब्यांचा निर्णय घेतला.