नागपूर : राजनगर भागातील रहिवासी असलेल्या एका व्यावसायिक डॉ. सुनील नरसिंह राव यांच्या अंगणातील विहीर स्वच्छ करण्यासाठी कामगारांना बोलावण्यात आले होते. त्यासाठी शंकर उईके आणि अमर मसराम हे दोघे आले होते. सुरुवातीला अमर हा विहिरीत उतरला. विहीर ५५ फूट खोल आहे. अमर विहिरीत उतरल्यानंतर बराच वेळ आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. शंकरने विहिरीच्या आत डोकावले असता अमर हा बेशुद्ध होऊन विहिरीत खाली पडला असल्याचे दिसले. ते पाहून शंकरसुद्धा विहिरीच्या आत गेला. शंकर देखील बेशुद्ध होऊन विहीरीत पडताच तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्याचवेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांना बाहेर काढले असता त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेनंतर परिसरात तणाव : विहीर स्वच्छ करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच परिसरातील लोकांनी डॉ. सुनील नरसिंह राव यांच्या घरासमोर गर्दी केली. त्यावेळी मृतकांच्या नातेवाईकांसह त्या भागातील इतर मजूर आणि स्थानिकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवले, त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेमुळे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.
मृत्यूचे नेमके कारण काय : विहिरीतील गाळ स्वच्छ करण्यासाठी विहिरीत गेलेल्या दोघांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, या संदर्भात संभ्रम चांगलाच वाढला आहे. पहिल्यावेळी अमर विहिरीच्या आत गेला तेव्हा त्याने शंकरसोबत संवाद साधला होता. त्यांनी काही गाळ देखील बाहेर काढला होता. त्यानंतर विहीरीत काय घडले असावे? ज्यात दोघांचा मृत्यू झाला या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर गाळ स्वच्छ करत असताना कुणीतरी मोटारपंप सुरू केला. विहिरीत विजेचा प्रवाह आला असावा, ज्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर विहीर स्वच्छ करताना विषारी वायू प्रवाहित झाल्याने देखील दोघांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.