नागपूर- आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नागपूरमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 वर्षीय मंथन चव्हाण या तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी नागपूरच्या अजनी पोलिसांनी गो-एअर कंपनीच्या दोघांवर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अजुन कोणालाही अटक झालेली नाही.
30 मे 2019 रोजी मंथन चव्हाण (वय 19) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. परंतू मंथनच्या आईने गो-एअर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून मंथनने आत्महत्या केल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे अजनी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मंथन आणि गो-एअर कंपनीच्या अधिकाऱ्यांचे फोन कॉल्सची रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले. मंथनची तब्येत बरी नसल्याने त्याने चार दिवसांची रजा घेतली होती. पण असे असताना त्याचे अधिकारी त्याला कामावर येण्यासाठी त्रास देत होते. एवढंच नाही तर त्याला अनेक वेळा अपमानीत देखील केले होते. या सर्व त्रासाला कंटाळून मंथने आत्महत्या केली होती. या घटनेच्या अडीच महिन्यांनी पोलिसांनी मंथनला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गो-एअर कंपनीच्या व्यवस्थापका सह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.