नागपूर - कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने उपराजधानी नागपुरात आरोग्य व्यवस्थेची तारांबळ उडाल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच मेडिकलच्या औषध उपचार विभागाच्या आकस्मिक रोग (casualty) वार्डात एकाच खाटेवर दोन - दोन रुग्ण ठेवावे लागत आहे.
सध्या ताप, सर्दी, खोकला अशा तक्रारींचे रुग्ण शासकीय रुग्णलायत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रुग्णांना मेडिकलमधील आकस्मिक विभागात ठेवण्यात आले आहे. मात्र, यामुळे वार्डात कमी खाटा आणि जास्त रुग्ण असे धक्कादायक चित्र निर्माण झाले आहे. लक्षणे पाहता हे सर्व रुग्ण कोरोना संशयित श्रेणीतील आहेत. या रुग्णांना लागण झाल्यास कोरोनाचे संक्रमण वाढण्याची दाट शक्यता आहे.
सामान्य वार्डात अशीच परिस्थिती राहिल्यास रुग्णाची इम्युनिटी कमी होऊन किंवा संसर्ग होऊन कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी यावर आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती गंभीर असतांना रुग्णांची परिस्थिती गंभीर होऊ नये, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
नागपुरात पुन्हा ३ हजारांवर रुग्णांची नोंद -
नागपुरात गुरुवारी ३ हजारांवर रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात 2,656 रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यात 1014 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात लॉकडाऊन असूनही रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने आरोग्य विभागावर ताण पडत आहे.
हेही वाचा- मुंबईत कोरोनाचा उद्रेक; गुरुवारी 5504 नवीन रुग्ण, 14 जणांचा मृत्यू