नागपूर - शहरात आणखी दोघांचा निर्घृणपणे खून झाल्याची घटना घडली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे, तर मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंडोअर स्टेडियम परिसरात एकाची हत्या झाली आहे. त्यामुळे उपराजधानीत पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनात आले आहे. गेल्या ४८ तासांत ही चौथी हत्या आहे. त्यामुळे कायद्याची भीती संपली की काय? असा संतप्त प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
पहिल्या घटनेत अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभय नगर येथील एका निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर स्थानिकांनी यासंदर्भात अजनी पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत तरुणीची माहिती मिळवायला सुरवात केली, तेव्हा सोनू गणवीर या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी सोनूला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याने तिचा खून केल्याची कबुली दिली. ती त्याच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावत असल्याने त्याने तिचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
दुसरी घटना ही मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंडोअर स्टेडियम परिसरात घडली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. त्यावेळी तो मृतदेह कचरा संकलन करणाऱ्या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले. झिंगारू या नावाने त्याला परिसरात ओळखले जायचे. मात्र, त्याच्याबद्दल कुणाकडेही माहिती उपलब्ध नाही. पोलिसांनी झिंगारुचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. त्याचा खून कुणी आणि का केला असावा? याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.