नागपूर - राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देऊन शहरातील आर्थिक बाबींना चालना देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत मनपाने स्टॅन्ड अलोन प्रकारची बांधकाम साहित्य, हार्डवेअर, होजियरी दुकाने, स्टेशनरी, इलेक्ट्रिकल, संगणक, मोबाईल आणि होम अप्लायंसेस दुरुस्तीची दुकाने अटी व शर्तीवर उघडण्यास 17 मे पासून परवानगी दिली आहे. मात्र, आता जे दुकानदार घालून दिलेल्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगरला जाणार आहे.
दुकानदारांनी, आस्थापना प्रमुखांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, परिसर निर्जूंतीकरण करणे, सॅनिटॉझरचा वापर इ. निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, काही ठिकाणी शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन होत नसल्याची बाब प्रशासनाच्या निर्दशनास आली आहे. दुकानदार, खासगी कार्यालयांनी दिशानिर्देशांचे पालन न केल्यास त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण तसेच साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
सामाजिक अंतर पाळले जात नाही, मास्क न वापरणाऱ्यांनाही दुकानात प्रवेश दिला जातो, दुकानातील काही कर्मचारीसुद्धा मास्कचा वापर करीत नसल्याचे आढळून आले आहे. रात्री ७ नंतर संचारबंदीचे आदेश असताना बऱ्याच व्यक्ती विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळत आहेत. संबंधित कार्यक्षेत्रात दिशानिर्देशांचे उल्लंघन होत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिशानिर्देशांचे पालन करणे आणि दुकानात येणाऱ्या ग्राहकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडणे, ही जबाबदारी पूर्णत: दुकानदारांची आहे. यापुढे यात कसूर होताना आढळल्यास संबंधित दुकानदारांच्या, आस्थापना प्रमुखांच्या तसेच संबंधित बेजवाबादार व्यक्तींच्या विरोधात भादंवि १८६०, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अंतर्गत कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त नागपूर यांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले आहेत. हा आदेश लॉकडाऊन संपण्याच्या कालावधीपर्यंत अर्थात ३१ मे पर्यंत लागू राहणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.