नागपूर - नागपूर-वर्धा मार्गावर डोंगरगावाजवळ आज (3 जून) दुपारी वळण घेत असताना दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेल्या परिचारिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निलू मूलचंद कोसमे (२० वर्षे, रा. गोंडामोहाडी, जि. गोंदिया) असे मृत्यू झालेल्या परिचारिकेचे नाव आहे. ती डोंगरगाव येथील गायकवाड पाटील कोविड रुग्णालयात परिचारीका म्हणून कार्यरत होती.
ट्रकच्या चाकाखाली आल्याने मृत्यू
निलू मूलचंद कोसमे होस्टेलवर राहत होती. तिला नागपूर शहरात काही काम असल्याने जात होती. गायकवाड पाटील कोविड रुग्णालयात काम करणारा कर्मचारी आशिष जांभुळकरच्या दुचाकीवर बसून ती डोंगरगाव बस स्टॉपवर जात होती. यावेळी जुन्या बंद टोलनाक्यावर वळताना नागपूरकडून बुटिबोरीच्या दिशेने एक ट्रक जात होता. या ट्रकने निलू आणि आशिष बसलेल्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली निलू ट्रकच्या चाकाखाली आली. ज्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक आशिष किरकोळ जखमी झाला आहे.
हिंगणा पोलीस घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केला. दरम्यान, हिंगणा पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - शरद पवार गॉडफादर, सरकारवर कंट्रोल तरी आरक्षण का नाही? - चंद्रकांत पाटील