नागपूर - दिवसेंदिवस नागपूरमध्येही कोरोनोग्रस्तांची संख्या वाढत आह. आज (सोमवार) दिवसभरात नागपुरात कोरोनाचे ५ रुग्ण आढळले. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२८ इतकी झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये एका एसआरपीएफ जवानाचा समावेश आहे.
कंटेनमेंट झोनमध्ये कार्यरत असताना त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर उर्वरित रुग्ण मोमीनपुरा, सिरसपेठ आणि हिवरीनगर येथील रहिवासी असून ते मुंबई येथून परत आले असल्याने त्यांना आधीच क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती पुढे आली आहे. आज ५ रुग्णांची भर पडली असताना नागपुरच्या मेयो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
त्यामुळे एकूण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा हा ३५६ इतका झाला आहे. नागपुरात सध्या ६५ अॅक्टिव रुग्णांवर मेयो आणि मेडिकल या दोन शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज १५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने नागपुरात कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याची टक्केवारी देखील वाढली आहे. तर तर आठ रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे.