नागपूर : भारतीय धार्मिक संस्कृतीत कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असे देखील म्हणतात. त्रिपुरी पौर्णिमा निमित्ताने विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीचे उत्सव साजरे केले जातात. नागपूरच्या रामटेक येथे त्रिपुरी पौर्णिमा ( Tripurari Purnima ) अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची परंपरा आहे. राम मंदिर आणि लक्ष्मण मंदिराच्या कळसावर जीर्ण वस्रे तुपात भिजवून जाळली जातात. ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह इतरही भागांतून रामभक्त मोठ्या संख्येत उपस्थित राहतात.
टिपूर जाळण्याची परंपरा आजही सुरू : धार्मिक सांस्कृतिक कार्तिक महिना महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक महिन्यात प्रामुख्याने लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णू यांचे पूजन केले जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो.धार्मिक मान्यतेनुसार त्रिपुरासुरावर भगवान शंकराने विजय मिळवल्याचे स्मरण म्हणून रामटेक येथील श्रीराम-लक्ष्मण मंदिरावर "टिपूर' जाळण्यात आला होता तेव्हा पासून ही परंपरा आजही तशीच सुरू आहे.
टिपूर जाळणे म्हणजे काय : भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता. त्या दिवसाचे स्मरण चिरंतन राहावे यासाठी ही यात्रा भरवली जाते. देवांचे जीर्ण झालेले वस्त्र त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुपात भिजवून ठेवली जातात. त्यानंतर बरोबर मध्यरात्री 12 वाजता राम मंदिर आणि लक्ष्मण मंदिराच्या कळसावर ती जीर्ण वस्रे जाळली जातात याला टिपूर जाळणे असे म्हणणे जाते.
गड-मंदिराचा इतिहास : रामटेकच्या प्रसिद्ध रामगिरी टेकडीवर 12 व्या शतकात यादव राजा रामदेवराय यांनी श्रीराम- जानकी व लक्ष्मणाची मंदिरे बांधली होती. पूर्वी येथे पाद्यपूजा होत असे. रघुजीराजे भोसले यांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार करून मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर या मंदिरात विविध उत्सव साजरे करण्यात येऊ लागले. तीच परंपरा अद्याप गडमंदिरावर सुरू आहे.गडमंदिरावर दोन मोठ्या यात्रा भरतात. एक रामनवमीला तर दुसरी कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमा यात्रा.