नागपूर - जिल्ह्याच्या पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या देवलापार वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४९८ मध्ये बांद्रा तलाव क्रमांक १ आहे. या तलवात एका प्रौढ वाघिणीचा चिखलात अडकल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी या वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार परिक्षेत्रात कक्ष क्रमांक ४९८ मध्ये बांद्रा तलाव आहे. सध्या तलावाच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे काही ठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. त्याच ठिकाणी एक वाघीण आज मृतावस्थेत आढळली आहे. वाघिणीचे चारही पाय खोल चिखलात रुतलेले आढळून आले. तसेच तोंडाचा आणि शरीराचा भाग देखील चिखलात रुतल्याचे समोर आले आहे. प्राथमिक परिस्थितीच्या पुराव्यानुसार सदर मृत वाघीण ही प्रौढ असून ती बहुदा तिच्या पिल्लांसह पाणी पिण्याकरता बांद्रा तलावात आली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.
आज सकाळी काहींना ती वाघीण मृत असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तपासणी केली असता वाघिणीचे नखे, मिशा यासह सर्व अवयव शरीराच्या मूळ जागेवर आढळून आले. त्यामुळे तिच्या शिकारीची शक्यता नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्यासंदर्भात वन अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून लवकरच त्याचा अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
