नागपूर - राज्यात शेकडो पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आतापर्यंत या संसर्गापासून दूर राहिलेल्या नागपूर पोलीस दलातही आता कोरोनाने शिरकाव केला आहे. नागपूर पोलीस दलातील २ व राज्य राखीव पोलीस दलाच्या एका जवानाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे शनिवारी रात्री निदान झाले आहे.
नागपुरातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेला मोमीनपुरा परिसर हा तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. या पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर, एक पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयातील असल्याची माहिती आहे. या तीन नव्या कोरोना रुग्णांमुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३४१ वर पोहोचली आहे.
नागपुरात शनिवारी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. हा ६५ वर्षीय रुग्ण १३ मे रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. शनिवारी त्याचा मृत्यू झाल्याने नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या ५ झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण १९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.