नागपूर- मध्यप्रदेश येथील जबलपूरचे व सद्या नागपुरातील मोमीनपुरा परिसरात राहणारे तिघे जण कोरोनाविषाणूला हरवून पूर्णपणे बरे झाले आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोरोना कक्षातून काल तिघांनाही सुट्टी मिळाली. रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स व परिचारीकांनी टाळ्या वाजवून या तिघा रुग्णांचे अभिनंदन केले आहे.
दिल्लीवरून परतलेल्या नागरिकांचा शोध घेऊन महानगर पालिकेतर्फे जबलपूर येथील तिघा रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले होते. यामध्ये ३४ वर्षीय, २४ वर्षीय आणि १७ वर्षीय तरुणांचा समावेश होता. या तिघांनाही आमदार निवास येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. १३ एप्रिलला या तिघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले होते. १४ दिवसांच्या रुग्णालय विलगीकरणादरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. २६ व २७ एप्रिलला तिघांचेही कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना काल घरी पाठविण्यात आले. रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे.
हेही वाचा- सतरंजीपुऱ्यातील 1200 नागरिकांची विलगीकरण कक्षात रवानगी