नागपूर - कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलीस विभागासह आणि इतर महत्त्वाच्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्याचा कार्यक्रम नियमीत सुरू आहे. आजपासून तिसऱ्या टप्यातील लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. नागपुरातील ११ शासकीय केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अनेक जेष्ठ नागरिकांना लस न घेताच परत फिरावे लागले. त्यामुळे अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तांत्रिक अडचणीमुळे जेष्ठ नागरिकांचा संताप -
आज(सोमवार)पासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर नागपुरातील जेष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. मात्र, ऐनवेळी तांत्रिक अडचणी आल्यामुळे ज्येष्ठांच्या उत्साहावर विरजण पडले. सकाळपासून लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, त्यांना लस न घेताच परत जावे लागल्याने त्यांचा संताप झाला आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मोहीम सुरू होण्यापूर्वीच लागला ब्रेक -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन स्वतःला लस टोचून घेतली. त्यानंतर संपूर्ण देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. तांत्रिक अडचणींमुळे नागपुरात मोहीम सुरू होण्यापूर्वी त्याला ब्रेक लागला. प्रशासनाने योग्य जनजागृती आणि नियोजन केले नसल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे.