नागपूर : रोहित देव यांनी वकील म्हणून चालविलेले अनेक खटले आजही चर्चेत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी गैरव्यवहाराच्या आरोपावरून भाजपची सत्ता असलेली नागपूर महानगरपालिका बरखास्त केली होती. या निर्णयाच्या विरोधात देवेंद्र फडणवीस हे न्यायालयात गेले असता न्यायमूर्ती रोहित देव यांनी वकील म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने खटला लढवला होता. अगदी मुद्देसूद आणि प्रभावीपणे त्यांनी बाजू मांडली. नागपूर महानगरपालिका बरखास्तीचा हा निर्णय कसा बेकायदेशीर आहे हे सिद्ध केले.
स्वतंत्रपणे केली वकिली : न्यायमूर्ती रोहित देव यांना उत्तम कायदेतज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर मृदु स्वभाव, अभ्यासू वृत्ती, कामातील प्रामाणिकपणा व सचोटी हा त्यांचा स्थायी भाव आहे. न्यायमूर्ती रोहित देव यांनी वकील म्हणून अनेक महत्त्वाचे खटले लढवले आहेत. ४ सप्टेंबर १९८६ रोजी वकील म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर १९९० ला त्यांनी स्वतंत्रपणे वकिली सुरू केली. न्यायमूर्ती रोहित देव यांनी अनेकवर्षे विक्रीकर विभागाकरिता विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज केले आहे.
पत्रकार म्हणून केले काम : रोहित देव हे मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांनी बहुतांश शिक्षण नागपूर येथेच पूर्ण केले आहे. ते विद्यार्थी असताना काही काळ पत्रकार म्हणून काम करत होते. काही कारणास्तव बंद पडलेल्या नागपूरच्या एका वर्तमानपत्रात त्यांनी दोन वर्षे उपसंपादक म्हणून नोकरी केली होती.
विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनाच्या मुद्द्यावर लढा : तत्कालीन भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी आघाडी सरकार काळात विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या खटल्यात त्यांनी भाजप नेत्यांच्या बाजूने लढा दिला होता. त्यावेळी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली. विदर्भातील अनुशेषाच्या मुद्द्यावर राज्यपालांनी दिलेले निर्देश सरकारने पाळणे बंधनकारक आहे की नाही, या मुद्द्यावरचा तत्कालीन सरकारतर्फे गुलाम वहानवटी यांनी केलेला युक्तिवाद देव यांनी खोडून काढला होता.
विक्रीकर, विद्यापीठासाठी केली वकिली : न्यायमूर्ती रोहित देव यांनी राज्याच्या विक्रीकर खात्याचे वकील म्हणून त्यांनी काम केले आहे. याशिवाय त्यांनी नागपूर विद्यापीठाचे विशेष वकील म्हणून काम पाहिले आहे. २०१४ सालापासून पुढील काही काळ नागपूर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात केंद्र सरकारचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांनी काम केले होते.
हेही वाचा:
- Justice Rohit B Deo News: भर न्यायालयात न्यायमूर्ती रोहित देव यांनी दिला राजीनामा, सांगितले 'हे' कारण
- Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन प्रचंड गदारोळ; लोकसभेसह राज्यसभा दुपारपर्यंत तहकूब
- Rahul Gandhi : राहुल गांधींचा संसदेत 'कमबॅक', अविश्वास प्रस्तावावरील चर्चेतही होणार सहभागी