नागपूर - शहरात आपली दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गाव गुंड नेहमी काहीना काही गैरमार्गाचा उपयोग करतात. गेल्या काही महिन्यांपासून नागपुरातील गुंडांच्या टोळ्या आपली दहशत निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या दुचाकी आणि चार चाकी गाड्या जाळत आहेत. शहरातील उंटखाना परिसरातील दहिपुरा भागात असलेल्या नागरी वस्तीत काही अज्ञात समाजकंटकांनी घराबाहेर पार्क केलेल्या वाहनांना आग लावल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवार-रविवारच्या मध्यरात्री साधारण दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. उंटखाना परिसरातील दहिपुरा ले-आऊटमध्ये उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांना काही गुंडांनी आग लावली. या ठिकाणी दहा ते बारा गाड्या उभ्या होत्या. यापैकी तीन कार पूर्णपणे जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. कार जळाल्याचे लक्षात आल्यावर तेथील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात काही कारचे नुकसान टळले. या प्रकरणी इमामवाडा पोलीस चौकशी करत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून ते तपासण्याचे काम सुरू आहे.
नोव्हेंबर महिन्यात सुद्धा घडली होती अशीच घटना -
नागपूर शहरातील अजनी आणि बेलतरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही गावगुंडांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने वीस पेक्षा जास्त गाड्यांच्या काचा फोडून एका कारला आग लावल्याची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी चिराग फुलकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. त्याने दारूच्या नशेत आणखी दोन मित्रांसह गाड्यांच्या काचा फोडल्याची कबुली दिली होती. त्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी अविष तायवाडे आणि रितेश डेकाटे नावाच्या दोन आरोपींना अटक होती.