नागपूर - शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हनुमान मंदिराची दानपेटीच चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही देखील पुढे आला आहे. ज्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
राज्य सरकारने मंदिरात सामान्य भाविकांना दर्शनाला जायची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सामान्य भाविकाला मंदिराच्या दारा बाहेरूनच देवाला नमस्कार करावा लागत असला तरी चोरटे मात्र अगदी आरामात देवापर्यंत पोहोचत आहेत. एवढेच नाही तर हे चोरटे टाळेबंदीमुळे बंद असलेल्या देवाच्या तिजोरीवर डल्ला ही मारत आहेत.
नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत जयहिंद सोसायटीमधील हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आला आहे. त्यामध्ये एक चोरटा देवाच्या समोर ठेवलेली दानपेटी घेऊन जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे चोरीच्या उद्दिष्टाने मंदिरात घुसलेल्या या चोराने जरी देवाच्या समोर ठेवलेली दानपेटी लंपास केली असली. तरी मंदिरात शिरताना आणि देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना या चोराने आपल्या चपला बाहेरच काढल्या होत्या. दानपेटीची तपासणी केल्यावर त्यात मोठी रक्कम असल्याचे दिसून आल्याने चोरट्याने ती फोडून रक्कम काढण्यापेक्षा संपूर्ण दानपेटीत घेऊन जाण्याचे ठरविले आणि दानपेटी उचलून सोबतच नेली. चोरांचे हे संपूर्ण कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. राज्य सरकार कोरोनाच्या भीतीपोटी मंदिर उघडण्याला परवानगी देत नसल्याने याचा गैरफायदा चोरटे उचलत आहेत.
चोरामध्ये आढळले सुसंस्कृतपणाचे लक्षण
घरफोडी करणारे चोर सर्व समानांची नासधूस करत मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारतातात. उलट मंदिरातून दानपेटी चोरट्याने चोरी करण्यापूर्वी चप्पल मात्र मंदिराबाहेर काढूनच आत मंदिरात प्रवेश केला. त्यांनतर सर्व खातरजमा करूनच आरोपीने मंदिराची दान पेटी लंपास केली आहे
दानपेटीत टाळेबंदी पूर्वीची रक्कम होती
दानपेटी चोरणार हा चोरटा अद्याप पकडला गेला नाही. त्यामुळे त्यात भक्तांनी दान केलेली किती रक्कम होती. या संदर्भात खुलासा होऊ शकला नसला तरी टाळेबंदीपूर्वीच्या अनेक महिन्यांची रक्कम त्यात असल्याने मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - कोराडी पोलिसांनी घातला नवा आदर्श... पोलीस ठाण्याच्या आवारात फुलवली परसबाग