नागपूर - जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून सर्वांसाठी विकासाचा मार्ग खुला झाला आहे. 370 नावावर जो भेदभाव मोठ्या प्रमाणात केला जात होता आता राहिला नाही, असे भाष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते नागपुरात पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
आधुनिक लडाखचे निर्माता कुशोक बकुला यांच्या जीवनावर आधारित हेमा नागपूरकर आणि कलम 370 वर आधारित डॉ. अवतार रैना लिखित पुस्तकांचे विमोचन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दोन्ही लेखकांचा सत्कारही जमू काश्मीर अध्ययन केंद्राच्यामार्फत सत्कारही करण्यात आला. यावेळी मंचावर सचिव अभिनंदन पळसपुरे उपस्थित होते.
काश्मीरी लोकांचे जीवन सुकर होत आहे
कलम 370 हटवण्यापूर्वीची परिस्थिती काश्मीर घाटीमध्ये 80 टक्के विकास निधी हा स्थानिक नेत्यांच्या खिशात जात होता. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. काश्मीरचे सर्वसामान्य लोक विकासकामांमुळे मिळत असलेल्या परिस्थितीचा फायदा घेताना दिसून येत आहे. हे सर्वांनाच आता चांगले वाटत आहे. स्थानिक लोकांचे जीवन आता सुकर होऊ लागलेले आहे.
लडाख भारतात असण्याच्या कार्यात बकुला यांचे मोठे योगदान
लडाख भारतात असण्यात आचार्य बकुला यांचे मोठे योगदान आहे. अनेकदा जमू-काश्मीरच्या बाबतीत आपले सैनिक कार्य करत असल्यास सैनिकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. या परिस्थितीत तांत्रिक बाबींमध्ये अडकवून ठेवले जाते आणि जे झाले पाहिजे ते होऊ देत नाही, हे प्रयत्न सुरू असते. कधी-कधी आपल्याला भ्रमित केले जाते. पण, या भारत देशाच्या अखंडतेला तोडण्याचा प्रयत्न करणारे लोक जेव्हा समोर येतात. तेव्हा आपल्या संविधानाचा सन्मान करून आपले कर्तव्य करत राहिले पाहिजे. तेच काम बकुला यांनी केले, असे भागवत म्हणाले.
दहशतवादची भीती कमी झाली आहे
कलम 370 असताना दहशतवाद विरोधी कारवाया करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे आतंकवाद विरोधी करवाया करताना या कारवायांचा फायदा फारसा होत नव्हता. पण, ती परिस्थिती आता राहिलेले नाही. त्यामुळे आतंकवाद्याची जी भीती आहे ती आता कुठेतरी समाप्त झालेली आहे. ज्यांनी आपापल्या मुलांच्या हातातीत पुस्तक काढून त्यांना दगड दिले. त्यांनीही आता आतंकवाद्यांची गुणगान करणे बंद केले आहे. आता लोकांच्या मनातून भीती निघाली आहे.
अजुन संकट संपले नाही
आपला मूळ स्वभाव आहे, एखादी दिसणारी समस्या दूर झाली की आपण अस्वस्थ होऊन सुस्त होऊन जातो. पण, संकट संपलेले नाही. 370 हे संकट नसून 370 ज्या कारणाने आले होते ते खरे संकट आहे. या ठिकाणी तीन प्रवाह दिसून येतात. एक काश्मिरी पंडितांना स्थायी होऊ नये यासाठीचा पाकिस्तान समर्थीत गट फूट पाडण्याचा प्रयत्न करणारा एक प्रवाह आहे. विकासाचे समर्थन करणाऱ्यांचाही स्वतंत्र प्रवाह आहे.
काश्मीरला स्वतःच्या पंखाखाली ठेवण्याचा पाकिस्तानचा मनसुबा
पाकिस्तान सोबत साठगाठ करून कट्टर सांप्रदायिक भेद मनात ठेवून काश्मीरला भारतापासून वेगळा करून आपल्या पंखाखाली ठेवण्याचा पाकचा मनसुबा आहे. एक मोठा वर्ग भ्रष्टाचारी नेता कारागृहात गेल्याने खुश आहे.
काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य अंग आहे
काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे. ज्याप्रमाणे शरीरातील आपले अवयव एकमेकांशी जोडलेले आहेत त्याच पद्धतीने काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य अंग आहे. आपण सगळे भारतीय आहोत हे विसरता कामा नये. तिथे पोहोचून हे चांगले संबंधाना प्रस्थापित करण्याचे काम करावे लागतील. तेथे सर्वांना सांगावे लागतील आम्ही भारतीय आहे.
हेही वाचा - रावणाने नागपुरातील 'या' कुटुंबाच्या जगवल्या सात पिढ्या