नागपूर - कोरोनामुळे सर्वत्र निराशेचे वातावरण असताना नागपूरच्यादृष्टीने अतिशय दिलासादायक आणि समाधानकारक बातमी पुढे आली आहे. आज पाचव्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या एकूण संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आली आहे. त्यामुळे नागपुरातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सुद्धा चांगलीच घट नोंदवण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्याबाहेर गेल्याने नागपूर शहरात आणि जिल्ह्यात अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या पाच दिवसात रुग्ण संख्या सरासरी ३० ते ३५ टक्यांनी घटत असल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ४ हजार ३९९ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ७ हजार ४०० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६६ हजार ११६ राहिली आहे. गेल्या आठवड्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ७५ हजारांपेक्षा जास्त होती. बुधवारी ८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ही ७ हजार ८२८ इतकी झाली. बुधवारी दिवसभरात २२ हजार ६१२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ज्यामध्ये १७ हजार ४८५ आरटीपीसीआर तर ४ हजार १२७ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. रुग्ण संख्या आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बघता नागपूरचा रिकव्हरी दर हा ८२.९२ टक्के इतका झाला आहे.
गेल्या चार दिवसांत 7527 ऍक्टिव्ह रुग्ण बरे
मंगळवारी नागपूर जिल्ह्यात 19 हजार 468 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण 4 हजार 182 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यामध्ये शहरी भागात 2 हजार 498 तर ग्रामीण भागातील 1 हजार 674 नविन बाधितांचा समावेश होता. 71 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शहरी भागात 40, ग्रामीण भागात 21 तर जिल्ह्याबाहेरील 10 जण कोरोनामुळे दगावले. 7 हजार 349 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रुग्णसंख्येत सलग पाचव्या दिवसात घट होऊन 76 हजार 726 वरून 69 हजार 199 वर पोहचली होती.