नागपूर- शहरातील नागरिकांना शिस्त लागावी व आपले शहर स्वच्छ, सुंदर राहावे यासाठी नागपूर महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक कार्य करते. उपद्रव पसरवून शहर विद्रुप करणाऱ्यांवर कारवाईद्वारे पथकाचे जवान चाप लावण्याचेही काम करत आहेत. मात्र, ही कारवाई करीत असताना किंवा जनतेशी कठोरतेने वागत असताना संवेदनशीलताही जपली जावी. कोविडच्या काळात सर्वच अडचणीत आहेत. त्यामुळे, कारवाई करीत असताना माणुसकी जागरूक ठेवून संवेदनशीलताही दाखवावी, असे आदेश महापौर संदीप जोशी यांनी दिले.
नियमांचे उल्लंघन करून कोविडच्या धोक्याला आमंत्रण देणाऱ्या ७ हजार ५८२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. मास्क न लावणे, बाजारामध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे पालन न करणे, अशा बाबींमध्ये कारवाई करून मनपाने ५ जून ते १८ ऑगस्ट २०२० या दरम्यान ७ हजार ५८२ जणांकडून ६६ लाख ४० हजार २०० रुपयांचा दंडसुद्धा वसूल केला आहे.
नागपूर शहरातील उपद्रव शोध पथकाच्या सर्व झोन प्रमुखांसोबत महापौर संदीप जोशी यांनी बैठक घेतली. त्यावेळी पथकाबद्दल मांडण्यात आलेल्या अनेक तक्रारींचे यावेळी निराकरण करण्यात आले. चर्चेमध्ये काही तक्रारींमध्ये कर्मचारी दोषी आढळले आहेत. अशा दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. शिवाय येत्या १० दिवसात पथकाची झोननिहाय कारवाई तपासण्यात येईल. त्यामध्ये दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी महापौरांनी दिला.
उपद्रव शोध पथकामध्ये २०१ जणांना मंजुरी मिळाली होती. सध्या १८० जण कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे, इतर २१ जणांची भरतीही ताबडतोब करण्यात यावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनीही उपद्रव शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीसंदर्भात वारंवार नगरसेवक आणि नागरिकांमार्फत तक्रारी येत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
मास्क न लावणे, बाजारामध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे पालन न करणे, अशा बाबींमध्ये कारवाई करून मनपाने ५ जून ते १८ ऑगस्ट २०२० या दरम्यान ७ हजार ५८२ जणांकडून ६६ लाख ४० हजार २०० रुपयांचा दंडसुद्धा वसूल केला आहे. मास्क लावण्याचा नियम न पाळणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. ५ जून २०२० पासून ही कारवाई सुरू करण्यात आली असून १८ ऑगस्ट २०२० पर्यंत मास्क न लावणाऱ्या ५ हजार ४३६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्यांकडून २०० रुपये दंड याप्रमाणे १० लाख ८७ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.
बाजारांमध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुरुवातीला १ हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश होते. त्यानुसार ५ जून ते १८ जुलै २०२० दरम्यान १ हजार ३८० दुकानांवर कारवाई करून १ हजार रुपये या प्रमाणे एकूण १३ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करण्यासंदर्भात १७ जुलै २०२० रोजी मनपाद्वारे नवीन आदेश काढण्यात आला. या आदेशानुसार सम व विषम तारखांच्या नियमांचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास ५ हजार रुपये, दुसऱ्यांदा ८ हजार रुपये व तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १० हजार रुपये दंड वसूल करण्याचे निर्देशित करण्यात आले.
आदेशानुसार १८ जुलैपासून नवीन नियमानुसार कारवाई करण्यात आली. १८ ऑगस्ट पर्यंत ६९५ दुकानांवर पहिल्यांदा नियमभंगाची कारवाई करून ५ हजार रुपये या प्रमाणे एकूण ४४ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. दुसऱ्यांदा झालेल्या कारवाईत ६ जणांकडून ८ हजार रुपये याप्रमाणे ४८ हजार रूपये दंड प्राप्त झाले. तर, तिसऱ्यांदा नियम तोडणाऱ्या ६५ दुकानांवर कारवाई करीत १० हजार रुपये याप्रमाणे एकूण ६ लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सम व विषम तारखांसंदर्भात जुन्या नियमानुसार १ हजार ३८० (१३ लाख ८० हजार रुपये दंड) व नवीन नियमानुसार एकूण ७६६ जणांवर (४१ लाख ७३ हजार रुपये दंड) कारवाई करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत एकूण ५५ लाख ५३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा- महापौर संदीप जोशींचा जीम सुरू करण्याला पाठिंबा, व्यायाम करून दर्शवणार समर्थन