नागपूर - विदर्भात तापमानात वाढ झाली असून आज राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद नागपुरात करण्यात आली. आज तब्बल ४६.५ अंश तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवू लागली आहे. नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत.
विदर्भात पुढील चार दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तो आज खरा ठरल्याचे पाहायला मिळाले. पश्चिमेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे विदर्भातील तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारीच तापमानाने ४५ अंशाचा टप्पा ओलांडला होता. मात्र, आज तापमानात तब्बल १ डिग्रीची वाढ झाल्यामुळे नागपूरचे तापमान ४६.५ अंश सेल्सिअस इतके झाले आहे. नागपूर पाठोपाठ अकोल्याचे तापमान ४६ डिग्रीवर पोहोचले आहे. आज विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या शहरांच्या तापमानाने ४५ अंशाचा टप्पा पार केला आहे.
विदर्भातील प्रमुख शहरांचे आजचे तापमान -
अकोला - ४६.०
अमरावती - ४५.६
बुलडाणा - ४३.०
चंद्रपूर - ४५.६
गडचिरोली - ४४.०
गोंदिया - ४५.४
नागपूर - ४६.५
वर्धा - ४५.५
वाशिम - ४२.६
यवतमाळ - ४५.२