नागपूर - कुही तालुक्यातील सालईमेंढा या गावात एका मित्राने आपल्याच मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत मित्राच्या प्रेयसीनेच खूनाची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सालईमेंढा गावातील एका 21 वर्षीय कल्याणी नामक तरुणीचे चंदू महापूर (वय 30 वर्षे) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, चंदू हा विवाहित होता. त्यामुळे कल्याणीचा विवाह दुसरीकडे लावून देण्याची तयार कल्याणीचे कुटुंबिय करत होते. याबाबत कळताच चंदूने यात आडकाठी आणण्यास सुरुवात केली. त्यानंतर कल्याणीने चंदूचा काटा काडायचे ठरवले. याबाबत तीने घरच्यांशी चर्चा केली व कल्याणी आई-वडीलही यासाठी तयार झाले. त्यानंतर त्यांनी चंदूचा बालपणीचा मित्र भारत गुजरला चंदूचा खून करण्यासाठी दीड लाख रुपये देण्याचे ठरवले. मात्र, भारतने दीड लाखात हे होणार नाही, असे सांगितले. त्यानंतर कल्याणीने भारतला शरीर सुखाचे आमिष दाखवले. त्यानंतर तो मित्राचा जीव घेण्यास तयार झाला.
असा काडला काटा
सौदा पक्का झाल्यानंतर कल्याणीने भारतला दिलेल्या सूचनेनुसार 25 फेब्रुवारीला दुपारी भारतने चंदूला मद्यपार्टीसाठी नेले. त्यानंतर सालईमेंढा गावाजवळ एका निर्जनस्थळी चंदू महापूरची गळा चिरुन हत्या केली.
बार समोरील सीसीटीव्हीमुळे झाला खुलासा
25 फेब्रुवारीला भारतने चंदूला ज्या बारमध्ये मद्यप्राशनसाठी नेले होते. तेथील सीसीटीव्ही कैमऱ्यात दोघे गप्पा मारताना कैद झाले होते. पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरू केला. पोलिसांनी भारत गुजरला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने चंदूच्या खुनाची कबुली दिली. चंदूच्या प्रेयसीकडून शरीर सुखाचे आश्वासन मिळाल्यानंतर आपल्याच मित्राला संपविल्याचा पश्चाताप भारतने पोलिसांकडे बोलून दाखवला. या प्रकरणी पोलिसांनी भारत गुजर, चंदूची प्रेयसी कल्याणी व तिच्या आई-वडिलांना अटक केली आहे.
हेही वाचा - छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नागपुरात आत्महत्या