नागपूर - जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होऊनही नागपूरला पाणीपुरवठा करणारी धरणं कोरडी पडली आहेत. त्यामुळे नागपूर शहराला पाणी कपातीपासून इतक्यात मुक्ती मिळण्याची शक्यता धूसरच आहे. राज्याच्या काही भागांत पूर परिस्थिती असली तरी नागपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मात्र अद्यापही पाऊस नसल्याने शहरात पाणी कपात सुरूच राहणार हे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील कोल्हापूरसह काही शहरांमध्ये पाण्याने हाहाकार घातला असतानाच विदर्भात मात्र दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाचा कोप काय असतो, हे दाखवणारे दोन वेगवेगळे चित्र राज्यात बघायला मिळत आहेत. नागपूर शहरात भर पावसाळ्यात पाणी कपात सुरू आहे. नागरिकांना एक दिवसआड पाणी मिळत आहे. नागपूर शहर आणि परिसरात सरासरी पाऊस पडला खरा. मात्र अजूनही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस झालेला नाही.
मध्य प्रदेश सीमेवर जर चांगला पाऊस झाला तर नागपूर शहराला पाणी पुरवठा करणारी धरणं भरतात. मात्र आजच्या घडीला तोतलाडोह धरणाचा डेड स्टॉकसुद्धा भरून निघालेला नाही. तर पेंच आणि गोंडखारी धरणातही अद्याप हवा त्या प्रमाणात पाणी साठा नाही. त्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे स्वतः महापालिकेचे पाणी पुरवठा सभापती सांगतात.
नागपूर शहरावर इतिहासात पहिल्यांदाच पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. मात्र आता अर्धा पावसाळा निघून घेला आहे. मात्र, धरण भरली नाहीत. पाणी कपात वाढविण्याची वेळ आली. त्यामुळे आता मध्य प्रदेश सरकारकडे पाण्याची मागणी केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.