नागपूर - शहरासह संपूर्ण विदर्भात सूर्य जणू आगच ओकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील अकोला या शहरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोला येथील आजचे तापमान ४७.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यामुळे भारतातील दुसऱ्या तर जगात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उष्ण शहर म्हणून नोंद झाली आहे. उपराजधानी नागपुरात सुद्धा ४७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले असल्याने भारतातील पाचव्या तर जगातील अकराव्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान असलेले शहर म्हणून नागपूर पुढे आले आहे.
नागपूरने गेल्या चार दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानाने आज उच्चांकी तापमान गाठले आहे. आज नागपुरात ४७.० अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. सरासरी तापमानापेक्षा पाच अंशाने आजचे तापमान जास्त राहिले आहे. यावर्षीचे हे सर्वाधिक तापमान ठरले. परंतु विदर्भात आज सर्वाधिक उष्ण शहर अकोला राहिले. अकोल्यात ४७.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. विदर्भातील ७ मोठ्या शहरांचे तापमान आज ४५ अंश सेल्सियसच्या वर राहिले आहे. ज्यामुळे उष्णतेची लाट अजून काही दिवस अशीच कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी विदर्भात रेड अलर्ट जारी केला आहे.
विदर्भातील प्रमुख शहरांचे आजचे तापमान -
- अकोला - 47.4
- अमरावती - 46.0
- बुलडाणा - 42.6
- चंद्रपूर - 46.8
- गडचिरोली - 43.2
- गोंदिया - 45.8
- नागपूर - 47.0
- वर्धा - 46.0
- वाशिम - 43.4
- यवतमाळ - 45.4