नागपूर: दोन दिवसापूर्वी नागपूर शहरातील राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका मोकळ्या भूखंडात पडीत बांधकामात मानवी हाडांचा सांगाडा आढळला होता. साधारणपणे तीन ते चार वर्षे जुना सांगाडा असावा असा अंदाज बांधला जातो आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असून प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यानुसार हा सांगाडा एखाद्या भिक्षेकरीचा असावा, कोरोना काळात भिक्षेकरीने त्या मोकळ्या भूखंडावरील पडक्या खोलीत आश्रय घेतला असावा आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला असावा. तीन ते चार वर्षांन पासून मृतदेह एकाच ठिकाणी पडून राहिल्याने त्याचे रूपांतर मानवी सांगाड्यात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पडक्या खोलीत मानवी सांगाडा: राणा प्रताप नगर परिसरातील एका भूखंडावर बांधकाम सुरू करण्याआधी जागा मालकाने भूखंड स्वछच करण्याचे काम सुरू केले. त्याच जागी असलेल्या पडक्या खोलीत मानवी सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी सांगाडा जप्त करून तो सांगाडा रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
सर्व बाजूने तपास सुरू: ज्या मोकळ्या जागेतील आउट-हाऊसमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे, तो प्लॉट सहा हजार चौरसफुटाच्या भूखंड आहे. त्या ठिकाणी झुडपी जंगलाप्रमाणे गवत वाढले होते. त्यामुळे तिथे कुणाचेही जाणे-येणे नव्हते. ज्यावेळी भूमिपूजनासाठी भूखंड स्वच्छ करण्यात आला, तेव्हा एक मानवी हाडांचा सांगाडा आढळला. सध्या या प्रकरणाचा तपास सर्व बाजूने केला जात असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अशोक बागुल यांनी दिली आहे. मात्र, जो प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे, त्या दृष्टीने देखील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. लवकरच अंतिम निष्कर्ष काढला जाईल असे त्यांनी सांगितले आहे.