नागपूर - नागपूर अमरावती महामार्गावर रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडून असलेल्या उंटाला नागपूरमध्ये आणून त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. भटकंती करणाऱ्या समूहापैकी कोणाच्या तरी मालकीचा हा उंट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या उंटाच्या जखमी झालेला पाय कापण्यात आला असून,उंटाची स्थिती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
रस्त्याने जाताना अज्ञात वाहनांच्या धडकेत उंट गंभीर जखमी झाला आहे.बराच काळ उंट जखमी अवस्थेत पडून होता. रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी याची माहिती नागपूरमधील प्राणी प्रेमी करिष्मा गिलानी यांना दिली. गिलानी यांनी लगेच क्रेन आणि ट्रकच्या सहाय्याने उंटाला नागपूरच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात आणून त्यावर उपचार सुरू केले. उंटाच्या डाव्या पायाला गंभीर जखम होती. इन्फेक्शन शरीरात जाऊ नये म्हणून 6 तास शस्त्रक्रिया करत त्याचा डावा पाय कापण्यात आला. भविष्यात उंटाला कृत्रिम पाय लावण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
उंट मालकाचा शोध सुरु
उन्हाळ्यात राजस्थान येथून अनेक नागरिक भटकंती करत विदर्भातील अनेक जिल्ह्यात येतात. त्यापैकीच एखाद्या गटाचा हा उंट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राणी प्रेमी करिष्मा गिलानी या उंटाच्या मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा -नागपूरच्या 'पेपर बोर्ड कंपनी'ला भीषण आग, नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू