नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उशिरा पाणी आल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात सुरू असलेल्या पाणी टंचाईमुळे येथे पाणीपुरवठा करणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटर असोसिएशनने गुरुवारी उशिरा पाणीपुरवठा केला. त्यामुळे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ४० शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. मात्र, नंतर १ वाजता पाणी पुरवठा झाल्याने नंतर त्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे रुग्णालयाच्या अधीक्षक संध्या मांजरेकर यांनी सांगितले.
शहरातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुरेसा पाऊस नसल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांमध्येही काही अंशी पाणी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांसोबत रुग्णालयातील रुग्णांना देखील पाणी टंचाईचा फटका बसत आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येणाऱ्या पाण्याचे आधी निर्जंतुकीकरण (ऑटोक्लेविंग) करण्यात येते. मात्र, पहाटे ५ ते ११ वाजेपर्यंत येणारे पाणी फक्त ९ वाजेपर्यंतच आल्यामुळे निर्जंतुकीकरण उशिरा झाले. त्यामुळे काही शस्त्रक्रिया स्थगित करण्यात आल्या. मात्र, १ वाजता पुन्हा पाणी पुरवठा करण्यात आला. त्यानंतर त्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे, रुग्णालयाच्या अधीक्षक संध्या मांजरेकर यांनी सांगितले.
पाणी टंचाईमुळे पुरेपूर पाण्याचा पुरवठा न झाल्यास रुग्णांच्या उपचारावर याचा परिणाम होऊ शकतो. रुग्णालयाला दररोज १ एमएलडी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, यावर्षी असलेल्या भीषण पाणी टंचाईमुळे इतिहासात पहिल्यांदा शहरात पाणी कपात करण्यात आली आहे. या आठवड्यात बुधवार, शुक्रवार, आणि रविवार या तीन दिवशी पाणी कपात केले जाईल. याबाबत, रुग्णालयांना देखील माहिती देण्यात आली आहे. रूग्णालयात केवळ दीड दिवसाचे पाणीसाठा करण्याची व्यवस्था आहे. म्हणून आणखी पाणी कपात केल्यास पाणी टंचाई रुग्णांच्या जीवावर बेतू शकते.