नागपूर - शहरात जीर्ण इमारतींची संख्या वाढतच चालली आहे. पावसाळ्याला सुरूवात झाली असून या इमारतींमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून जीर्ण इमारती रिकाम्या कराव्यात यासाठी अग्निशामक दलाने नोटीस बजावल्या होत्या. परंतु नोटीस बजावून देखील इमारत न केलेल्या ६६० इमारती आणि घरांचा वीज आणि पाणीपुरवठा खंडीत करण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकऱ्यांनी दिली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत जीवित आणि वित्त हानी टाळण्याची महत्त्वाची जबाबदारी अग्निशमन विभागाची आहे. महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळा आणि उन्हाळ्यापूर्वी उपाययोजना करून शहरातील जीर्ण इमारतीची माहिती एकत्रित केली जाते. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत अशा जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करून फक्त नोटीस बजाविण्याचे काम महापालिका करतेय. परंतु कारवाई बाबत पालिकेचे उदासीन धोरण बघायला मिळाले.
गणेशपेठ, इतवारी, महाल, सतरंजीपुरा अशा अनेक वस्त्यांमध्ये जीर्ण घरांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. एकीकडे महापालिकेची अतिक्रमण कारवाई जोमात सुरू आहे. मात्र, जीर्ण इमारती वर्षानुवर्षे त्याच परिस्थितीत बघायला मिळते अशा जीर्ण इमारतींकडे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे.