नागपूर - लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या स्वगृही पोहोचविण्यासाठी एसटी बस सज्ज झाली आहे. नागपुरात अडकलेल्या परराज्यातील कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी आज शहरातील गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावरून ४० बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे परप्रांतीय मजूर, विद्यार्थी राज्यात अडकले आहेत. खायला अन्न नसल्यामुळे अनेकांनी पायी प्रवास करत गाव गाठले. त्यानंतर मजुरांसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या. तसेच आता या परप्रांतीयांना सोडण्यासाठी एस. टी. महामंडळाने पुढाकार घेतला असून त्यांना त्यांच्या गावी पोहोचवण्यात येणार आहे.
परप्रांतीय मजुरांना बसमधून त्यांच्या गावाला जाण्याची संधी मिळाली आहे. यासाठी नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी यापूर्वीच केली होती. त्यांना आता बसेसच्या माध्यमातून गावाला सोडण्याचे काम सुरू झाले आहे. बससमध्ये जाताना सोशल डिस्टन्सिंग पाळत एका सीटवर एकच व्यक्तीला बसण्याची परवानगी आहे. शहरातून या बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये छत्तीसगड आणि मध्यप्रदेशच्या नागरिकांचा समावेश आहे.