नागपूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परिक्षेचा आज निकाल जाहीर झाला. नागपूर विभागाचा निकाल ९३.८४ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी निकालात २६.५७ टक्केने वाढ झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. नागपूर विभागातून गोंदिया जिल्ह्याचा सर्वाधिक ९५.२२ टक्के इतका निकाल आला आहे तर सर्वात कमी निकाल वर्धा(९२.१० टक्के) जिल्ह्याचा लागला आहे. संपूर्ण नागपूर विभागातून १ लाख ६१ हजार ३९९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ५१ हजार ४४४ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीच्या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के इतका लागला आहे. त्यात कोकण विभागाने बाजी मारली आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी आला आहे. नागपूर विभागाच्या निकालात देखील यंदा कमालीची वाढ झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. नागपूर विभागाचा गेल्या वर्षीचा निकाल हा ६७.२७ टक्के इतका होता. यावर्षी २६.५७ टक्क्याने निकालात वाढ झाल्याचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सांगितले.
विभागाचा जिल्हानिहाय निकाल -
गोंदिया - ९५.२२ टक्के
भंडारा - ९४.४१ टक्के
चंद्रपूर - ९२.४४ टक्के
नागपूर - ९४.६६ टक्के
वर्धा - ९२.१० टक्के
गडचिरोली - ९२.६९ टक्के