नागपूर - शहर आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या ठिकाणी तसेच निवारागृहात वास्तव्यास असलेल्या उत्तरप्रदेश राज्यातील सुमारे ७८४ मजुरांना त्यांच्या स्वगृही पाठवण्यात आले आहे. ११२२ प्रवासी मजूर घेऊन नागपूरहून श्रमिक स्पेशल गाडी उत्तरप्रदेशमधील बलियाकडे रवाना झाली. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ७८४ मजूर तर इतर जिल्ह्यातील ३३८ मजूर प्रवाश्यांचा सहभाग होता.
राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी या गाडीला हिरवा कंदील दाखवला. आतापर्यंत लखनऊ, मुझफ्फरपुर आणि बलिया अशा श्रमिक स्पेशल ट्रेन नागपूरहून सोडण्यात आल्या असून जिल्ह्यातील तसेच नागपूर महसूल विभागातील मजुरांना मोठ्या प्रमाणात आपल्या स्वगृही पाठविण्यात येत आहे.
दरम्यान, देशात दिसऱ्या टप्प्याचे लॉकडाऊन सुरू असून नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. तसेच देशातील मुख्य शहरांना जोडणाऱ्या महत्वाच्या १५ रेल्वेगाड्या प्रायोगित तत्वावर दिल्लीतून सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. देशात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांसाठी प्रत्येक राज्यातून इतर राज्यांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात येत आहेत. अनेक मजुरांना घरी पोहचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र, अजुनही असे अनेक मजूर आहेत जे चालतच आपल्या गावी निघाले आहेत.