नागपूर - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मोहीमांची ( India space mission ) आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची माहिती ही बस ( Istro Space on Wheels Bus) घेऊन आली आहे. या बसमध्ये चांद्रयान-1 मोहीम,मंगलयान मोहीम, ( Mangalyaan campaign ) अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसेच इस्त्रोने आतापर्यंतचा अंतराळ प्रवास आपल्याला पहायला मिळतो आहे. चांद्रयान, मंगलयान मोहीम राबविण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, मोहीमेची माहिती तसेच ही मोहीम राबविताना आलेली आव्हाने याची माहिती देण्यात आली आहे.यासोबतच या बसमध्ये लावलेल्या स्क्रीनच्या माध्यमातून इस्त्रोचा ( ISRO ) प्रारंभापासून ते आतापर्यंतचा अंतराळ प्रवास विशद करण्यात आला आहे.
विज्ञानाविषयी जनजागृती - सर्वसामान्यांना इस्त्रो या संस्थेची माहिती व्हावी यासाठी या विज्ञान परिषदेत स्पेस आन व्हिल्स ठेवण्याचा उद्देश आहे. विशेषतः तरुणांमध्ये विज्ञानाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. देशातील अत्यंत महत्वपूर्ण अशा विज्ञान विषयक प्रदर्शनात ही बस पाठवली जाते. विशेषतः तरुणाईचा अत्यंत उस्फूर्त असा प्रतिसाद स्पेस आन व्हिल्सला मिळत आहे.
गगनयान मिशनला विलंब - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ‘गगनयान मिशन’ची घोषणा केली होती. ते लक्ष्य २०२२ मध्ये साध्य करावयाचे होते. तथापि, कोरोना महामारीमुळे विलंब झाला. त्यामुळे सहा महत्वपूर्ण चाचण्यांच्या यशस्वीतेनंतर मानव अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्याबाबत ठरवण्यात येईल, अशी माहिती इस्त्रोचे अध्यक्ष तसेच अंतराळ विभागाचे सचिव डॉ. एस. सोमनाथ यांनी पत्रपरिषदेत दिली. गगनयान मिशन अर्थात भारताकडून मानव अंतराळात पाठविण्याचे अभियान यासाठी संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशा चाचण्या झाल्यानंतरच या संदर्भातील निर्णय घेण्यात येईल,अशी माहिती त्यांनी दिली. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी अंतराळ विज्ञानावर आयोजित सत्रामध्ये भाग घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संबोधित केले.
अंतराळ धोरणाची लवकरच घोषणा - भारताच्या अंतराळ धोरणाची लवकरच घोषणा करण्यात येईल. फेब्रुवारी २०२२ मध्ये अंतराळ धोरणाच्या पहिल्या मसुद्यावर चर्चा झाल्यानंतर अंतराळ विभागाने त्यावर काम केले. आता हा मसुदा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला आहे. हे धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाकडे जाण्यापूर्वी प्रधानमंत्री कार्यालय, संबंधित विभाग, मंत्रालयांशी सल्लामसलत करील,असे सोमनाथ यांनी सांगितले.
होलिस्टिक मॉडेल्स चर्चा - रोग निदान उपचारासाठी जिनोमिक्स, झेब्राफिश, तसेच मानवीकृत उंदीर, होलिस्टिक मॉडेल्स या नवपद्धतींच्या वापराबाबत रसायनशास्त्र विभागात सांगोपांग चर्चा करण्यात आली. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी गेथर्सबर्ग येथील डॉ.प्रसाद धुलिपाला उपस्थित होते. अनुवांशिक आजारांत कर्करोग,मतिमंदता, जन्म दोष, न्यूरोडीजनरेटिव्ह रोग इ. समाविष्ट होतात. जीनोमिक बदल ओळखणे, त्यात असलेली जीन्स निदान, उपचारासाठी मार्गदर्शक ठरेल. आनुवंशिक विकारांच्या निदानासाठी क्लिनिकल प्रयोगशाळांनी नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग (NGS) स्वीकारले आहे. NGS पद्धती उत्परिवर्तन शोधण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात अशी माहिती डॉ. प्रसाद धुलिपाला यांनी दिली.
रोग निदान, उपचारासाठी नवपद्धती - संवर्धन धोरणांचा वापर, एका जनुकाचे क्लिनिकल विश्लेषण, मल्टी-जीन पॅनेल किंवा सर्वज्ञात प्रोटीन कोडिंग जीन्स (एक्सोम सिक्वेन्सिंग) लागू केले जातील. याशिवाय श्रवणशक्ती कमी होणे, दृष्टी कमी होणे, हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी विकार, मूत्रपिंडाचे विकार, न्यूरोलॉजिकल विकार, कर्करोगाची पूर्वस्थिती इ. साठीही हे तंत्र वापरले जाऊ शकते. संपूर्ण जीनोम अम्प्लीफिकेशन (WGA) पद्धतीमुळे रक्त, सूक्ष्म सुई आकांक्षा, बायोप्सी अभिलेखीय नमुने यांसारख्या नमुन्यांमधून जीनोमिक डीएनए तयार करणे शक्य होते. जलद, संवेदनशील विश्वासार्ह RNA प्रमाणिकरणासाठी नवीन पद्धती विकसित करण्याकडे लक्ष वेधले गेले आहे.
जागतिक दर्जाच्या डॉक्टरांची उपस्थिती - नेब्रास्का मेडिकल सेंटर (UNMC) च्या फार्माकोलॉजी, प्रायोगिक न्यूरोसायन्स विद्यापीठ येथील डॉ. संती गोरंटला, उत्तर टेक्सास युनिव्हर्सिटी ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस विभाग येथील डॉ. पुदुर जगदीश्वरन, बंगलोर येथील डॉ. सृजना नरमला आदीनी या चर्चासत्रात उपस्थित दर्शवली. डॉ.प्रसाद धुलीपाला यांच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.
नव्या जीवनशैलीमुळे शरिरावर घातक परिणाम - हृदयविकार, मधुमेह नव्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विकारांमध्ये अलिकडच्या संशोधनातून नवीन घातक घटक असल्याचे निदर्शनास आले आहेत. हे घटक वेळीच ओळखून सजग राहून आपला बचाव करावा, असे प्रतिपादन डॉ. शंतनू सेनगुप्ता यांनी केले.भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात ‘हृदयविकार, मधुमेह या विषयातील नवीन संशोधन’ याविषयावर चर्चा झाली. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. जी. वसिष्ट हे होते. तर या चर्चासत्रात डॉ. शंतनू सेनगुप्ता, डॉ. सुनील गुप्ता या तज्ज्ञांनी सहभाग घेतला. हे दोन्ही मान्यवर नागपूरकर आहेत.
दररोज 8 ते 10 हजार पाऊले चालावे - डॉ. सेनगुप्ता हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी लिपोप्रोटीन सारख्या नवीन जोखीम घटकांची लवकर ओळख प्रतिबंध हे महत्त्वाचे आहेत. हार्ट अटॅकला जबाबदार पर्यावरणीय, वर्तणूकीय,रोगनियंत्रण ( रक्तदाब-मधुमेह ) इ. घटक आहेत. यावर उपाय म्हणून दररोज 8 ते 10 हजार पाऊले चालावे. अर्ध्या तासापेक्षा अधिक कालावधीसाठी स्थिर बसल्यास थोड्या थोड्या वेळात चालावे. डिजिटल साधनाचा अतिवापर हा घातक आहे, असे डॉ. सेनगुप्ता यांनी सांगितले.
‘पेशंट विथ डायबिटीज’- 2021 मध्ये 537 दशलक्ष प्रौढ मधुमेहासह जगत होते. ही संख्या 2030 पर्यंत 643 दशलक्ष आणि 2045 पर्यंत 783 दशलक्षपर्यंत वाढण्याचे अनुमान आहे. रक्तातील ग्लुकोजचे लवकर निदान, नियंत्रण यावरच लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भारतीय लोक इतरांपेक्षा वेगळे आहेत. त्यांची शरीराची रचना बारीक असली तरी शरीरात फॅट्सचे प्रमाण भरपूर असते. मधुमेही व्यक्तीला आपण रोगी न म्हणता ‘पेशंट विथ डायबिटीज’ अस म्हणावं. रोगाचे निदान न होता तसेच इन्सुलिनचे प्रमाण माहिती नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याबाबत अधिक माहिती असल्यास अनेक रुग्णांचे जीव वाचवता येतील,असे डॉ. गुप्ता म्हणाले.
मानसिक आरोग्यावर परिणाम - कोविड 19 च्या महामारीनंतर विविध प्रकारे शारिरीक, मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून अशा सर्व घटकांबाबत आजच्या ‘कोविड 19 संसर्गाचे दीर्घकालीन परिणाम’, या विषयावरील परिसंवादात अभ्यासपूर्ण चर्चा झाली. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या गणित विभागाच्या श्रीनिवास रामानूजन सभागृहात हे चर्चासत्र पार पडले. राकेश अग्रवाल अध्यक्षस्थानी होते.
कोविड पश्चात हृदयक्रियांमधील जटीलता- या चर्चासत्रात डॉ. देवेंद्र अग्रवाल यांनी ‘कोविड पश्चात उद्भवणाऱ्या वैद्यकीय जटीलतांविषयी आढावा’, डॉ. तन्वी सिंघल यांनी ‘कोविडनंतर उद्भवणारे दुय्यम संसर्ग’, डॉ. विद्यालक्ष्मी सेल्वराज यांनी ‘कोविड पश्चात मानसिक आरोग्य’ तर डॉ. विनीत अग्रवाल यांनी ‘कोविड पश्चात हृदयक्रियांमधील जटीलता’, याविषयी आपले शोधनिबंध सादर केले.
कोविड पश्चात गुंता गुंतांगुंत वाढणे - 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळ कोविड संसर्ग राहणे वा त्यावरील उपचार सुरु राहणे कोविड पश्चात गुंतागुंतींचे प्रमुख कारण आहे. अशा रुग्णांमध्ये पेशींची हानी होणे, चव, गंध ओळखणाऱ्या संवेदनांची कमी होणे, पेशींना सुज येणे, मधुमेहाशी निगडीत गुंतांगुंत वाढणे इ. 62 प्रकारच्या गुंतागुंत नोंदविण्यात आल्या आहेत. या शिवाय केस गळणे, वारंवार थकवा येणे, आवाजात बदल होणे, भिती, नैराश्य अशा लक्षणांमध्येही वाढ झाल्याचे दिसून आले आहे असे डॉ. देवेंद्र अग्रवाल यांनी म्हटले आहे.
कोविड संसर्ग आडून अन्य संसर्ग विकसित- डॉ. तनु सिंघल यांनी सादर केलेल्या शोधनिबंधात दुय्यम संसर्गांविषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यांनी सांगितले की, कोविड उपचारादरम्यान अधिक काळ अतिदक्षता विभागात दाखल असणे, कृत्रिम श्वसनावर अवलंबून असणे, त्यासाठी वापरलेला ऑक्सिजन सदोष असणे, अस्वच्छता इ. कारणांमुळे हे संसर्ग विकसित होतात. त्यात काळी बुरशी सारखा संसर्ग, न्युमोनिआ, मुत्रमार्गातील संसर्ग, रक्तमार्गातील संसर्ग इ. संसर्गांचा समावेश होतो. उपचारादरम्यान असे लक्षात येते की, रुग्णाला जरी कोविड संसर्ग झाला असला तरी प्रत्यक्षात त्याआडून अन्य संसर्ग विकसित होतात आणि रुग्ण अत्यवस्थ होतो.
विविध मानसिक समस्यांची निर्मिती - डॉ.विजयलक्ष्मी सेल्वराज यांनी आपल्या शोधनिबंधात मांडले की, कोविड आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अभुतपूर्व परिस्थिती उदा. लॉकडाऊन, जवळच्या नातेवाईकांचे मृत्यू, आजारपण, संसर्गाच्या भितीने त्यांची सुश्रुषा करता न येणे तसेच अन्य कारणांमुळे सामाजिक वातावरणात बदल घडले. या परिस्थितीमुळे लोकांना एकलकोंडेपणा, भय अशा मानसिक घटनांना सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम म्हणून लोकांना विविध मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले. अनेक लोक व्यसनांना बळी पडले. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. उपचारानंतर बरे झाल्यानंतरही नैराश्य, तणाव, भिती, निद्रानाश, लैंगिक समस्या अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
हृदयक्रियेत विविध अनियमितता - डॉ. विनीत अग्रवाल यांनी ‘कोविड पश्चात हृदयक्रियांमधील जटीलता’, याविषयावर आपला शोधनिबंध सादर केला. या संशोधनासाठी त्यांनी 1 लाख 53 हजार रुग्णांचा अभ्यास केला. कोविडच्या अधिक काळ उपचारानंतर अशा रुग्णांना हृदयक्रियेत विविध अनियमितता होत असल्याचे निदर्शनास आले. त्यात हृदयविकाराचा झटका येण्यापर्यंत बाबी निदर्शनास आले असल्याची मांडणी केली आहे.