नागपूर Sontu Jain Surrender : सोंटू जैन भारतात परतल्यानंतर त्याला काही दिवस अटकपूर्व अग्रीम जामीन मिळाला होता. मात्र, तो जामीन रद्द होताच सोंटू जैन पुन्हा एकदा नागपुरातून पळून गेला होता. (Sontu Jain surrendered in Nagpur court) आज तो अचानक न्यायालयासमोर हजर झाला आणि शरणागती पत्करली आहे. ऑनलाइन गेमच्या जाळ्यात अडकवून अनेक मोठ्या व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा (Money Fraud Case) घालणारा आरोपी अनंत उर्फ सोंटू जैन नागपूर पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत गेल्या महिन्याच्या २७ सप्टेंबरला पळून गेला होता. त्यानंतर तब्बल २० दिवसांनी तो न्यायालयासमोर हजर झाला आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे : आरोपी सोंटूने ऑनलाइन गेमच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेली आहे. या संदर्भात नागपूर पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणात आरोपीची थेट लिंक जुळल्याचे आढळले. विशेष तपास पथक या प्रकरणी पाहणी करत आहे.
५५ बँक खाती पोलिसांच्या रडारवर : सोंटू जैनने ऑनलाइन गेमच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वेगवेगळ्या तब्बल ५५ बँक खात्यांचा वापर केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. ही सर्व बँक खाती गरिबांच्या नावावर आहेत. यामध्ये घरकाम करणारे नोकर आणि मजुरांचा देखील समावेश आहे.
काय आहे प्रकरण, समजून घ्या : कमी वेळेत भरपूर पैसे कमावण्याचं आमिष दाखवून आरोपी अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन याने ऑनलाईन गेमिंग अॅपच्या मदतीनं नागपूर येथील एका व्यापाऱ्याची ५८ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. हे प्रकरण नागपूर शहर पोलिसांपर्यंत गेल्यानंतर तो दुबईला पळून गेला होता. पोलिसांनी चारही बाजूने कोंडी केल्यानंतर सोंटू अटकपूर्व जामीन मिळवत भारतात परतला होता. मंगळवारी न्यायालयानं त्याचा जामीन रद्द केला. त्यामुळे त्यानं पोलिसांच्या समोर हजर होणं अपेक्षित होतं; परंतु तो पळून गेला आहे.
कोट्यवधी रुपयांची रोकड आणि ऐवज जप्त : या प्रकरणासंदर्भात नागपूर पोलिसांनी २२ जुलै रोजी गोंदिया येथे सोंटू जैनच्या घरी धाड टाकून तब्बल १६ कोटी ८९ लाखांची रोकड, १२ किलो ४०३ ग्रॅम सोनं आणि २९४ किलो चांदी असा २७ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर गोंदिया मधील काही बँक लॉकरमधूनही ४.५४ कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली होती. आतापर्यंत जप्त मुद्देमालाची किंमत ३१ कोटी रुपये इतकी झाली आहे.
हेही वाचा: