नागपूर - कोरोनाची झळ सर्वसामान्य कुटुंबांना कशी बसली, हे आपण रोज पाहतो आहे. अनेक जण हे स्वतः अनुभवत आहे. पण याची झळ लहान मुलांना कशी बसत आहे, हे जाणून घेण्यासाठी या चिमुकलीचे पत्र वाचावे लागेल. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्या इशिका भाजेने एक पत्र लिहीले आहे. ही व्यथा केवळ तिची नसून महाराष्ट्रातील कित्येक घरातील अशाच इशिका आणि त्यांच्या पालकाची ही व्यथा आहे.
नागपूरातील नरसाळा भागात सत्यसही विद्या मंदिरात सहाव्या वर्गात शिकणारी इशिका ही लॉकडाऊनमुळे घरात आहे. शाळा बंद असल्याने तिने काही दिवस ऑनलाईन क्लास केले. पण अभ्यासात हुशार असणारी इशिका ऑनलाईन क्लासला हजर राहणे बंद झाले. तिच्या गैरहजेरीबाबत तिचे वर्ग शिक्षक खंडारे यांनी चौकशी केली. तेव्हा इशिकाने वर्ग शिक्षकांना घरातील बिकट परिस्थिती सांगितली. हे शाळेला का कळवले नाही, असे विचारले तेव्हा तिने ही परिस्थिती पत्रात लिहून मुख्यध्यापकांना कळवली.
काय आहे पत्रात? -
या पत्रात इशिकाने घरात दोन भावंड असल्याने दर महिन्याला लागणारा रिचार्जचा खर्च परवडत नसल्याचे तिने पत्रात म्हटले आहे. यामध्ये इशिकाची आई चार वर्षांपूर्वी मरण पावली आहे. तिचे वडील हे 12 वर्गात असणाऱ्या मोठ्या भावाला घेऊन वेगळे राहत आहे. तेच इशिका लहान असल्याने तिच्या मावशीकडे राहत होती. त्यांनाही दोन मुले असून मावशी तिचे संगोपन करत होती. पण मावशी आणि त्यांचे पती दोघांचाही जॉब गेल्याने आर्थिक अडचणीत सापडले. यानंतर मावशीच्या पतीला कोरोनाची लागण झाली. त्यांना आर्थिक अडचणी सोबत मृत्यूशी झुंज द्यावी लागली. यामुळे इशिका ही आजोबा (आईचे वडील) मधुकर येरपुडे यांच्याकडे राहायला आली. यात तिच्या आजोबांची परिस्थिती सर्वसामान्य वयोमाने औषधांचा खर्च, घरातील खर्च, लहान मुलीला आर्थिक अडचणीतून जाताना मदत या दुष्टचक्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत तिने पत्रात लिहिले आहे.